प्रतिनिधी / सांगली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री मधून बाहेर पडत नाहीत. ते नामधारी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी सरकार चालविण्याचे कंत्राट शरद पवार यांच्याकडेच दिले असल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ठाकरे यांना लगावला. सांगली-मिरजेतील सव्वा सात कोटी रुपयांच्या विकासकामांचा आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षासह अडीच कोटींच्या कामांचा लोकार्पण सोहळा चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांना जनतेच्या समस्या समजून घ्यायला वेळ नाही. ते मातोश्री मधून बाहेर पडत नाहीत. शरद पवार मात्र महाराष्ट्रात फिरतात. त्यांच्याकडेच राज्य चालविण्याचे कंत्राट ठाकरे यांनी दिले आहे. दरम्यान राज्यात शिवसेनेचा भगवा फडकवा, असे म्हणण्यापेक्षा ठाकरे यांनी तिरंगा फडकवा, असे म्हणायला हवे होते. असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना हाणला.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांचे कौतुक केल्याबाबद्दल विचारले असता ते म्हणाले, राजकारण, निवडणुका एका महिन्यापुरत्या मर्यादित असतात. त्यानंतर विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायचे असतात. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांचे केलेले कौतुक किंवा जयंत पाटील यांनी शेखर इनामदार व मकरंद देशपांडे यांच्याशी मैत्री असल्याचे केलेले वक्तव्य स्वभाविक आहे. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे.