ऑनलाईन टीम / पुणे :
राज्य सरकारने देखील महापालिकांना कोरोनाच्या लढ्यात आर्थिक मदत केली पाहिजे. पुण्याचा विचार करता पुण्यात सध्या टेस्टिंगची क्षमता फारच कमी आहे ती वाढवण्याची आवश्यकता आहे. पण अजूनही पुण्यासारख्या शहरात अतिरिक्त टेस्टिंगची होत नाही. याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात अधिक वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संदर्भातील या भागात येणाऱ्या अडचणी समजून त्या सरकार पर्यंत पोहोचविणच्या दृष्टीने हा दौरा आयोजित केला आहे. अजून ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे, त्या भागात जाऊन तेथील समस्या देखील समजावून घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, पुणे प्रशासनाचा प्रयत्न चांगला सुरू आहे. पण पुण्यासारख्या शहरात टेस्टिंग दुप्पट करणे ही काळाची गरज आहे. दिल्लीत टेस्टिंगची संख्या वाढते आहे मग मुंबईत का नाही? असा सवाल करत मुंबई आणि महाराष्ट्रातील टेस्टिंगचे प्रमाण कमी आहे हे धोकादायक आहे आणि याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, खाजगी रुग्णालयात कोरोना उपचारांसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याने दिवाळं निघत आहे. त्यामुळे सरकारच्या रेट कार्ड प्रमाणेच रुग्णांकडून आकारणी केली जावी असे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच पुढील दोन महिने ऑक्सिजन आणि बेडची जास्तीत जास्त गरज लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.