सीआयडी पोलीस वनविभागाची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
रानडुकराची शिकार करून त्याचे मांस विकणाऱया दोघा शिकाऱयांना सीआयडी पोलीस वनविभागाच्या अधिकाऱयांनी अटक केली आहे. सुळेभावी येथे मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. पोलीस वनविभागाच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.
सुळेभावी परिसरात रानडुकराचे मांस विक्री केले जात असल्याची माहिती मिळताच सीआयडी पोलीस वनविभागाच्या पथकाने अचानक छापा टाकून रमेश उर्फ रामू नरसाप्पा डोंबर (वय 26), इराण्णा साबु दुर्गमुर्गी (वय 30, दोघेही रा. कैलासनगर, सुळेभावी) यांना अटक केली.
या पथकात के. डी. हिरेमठ, एम. ए. नाईक आदींचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या दोघा जणांवर 2(16)(20)(35), 9, 39(1)(ए), 51, वन्यजीवी संरक्षण कायदा 1972 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले.