ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राफेलच्या पहिल्या तुकडीने भारतात येण्यासाठी आज फ्रान्समधून उड्डाण केले आहे. बुधवारी (दि.29) ही राफेल विमाने हरियाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर दाखल होतील.
भारतीय लष्कराने 2016 मध्ये 36 राफेल फायटर विमाने खरेदी करण्यासाठी 59 हजार कोटींचा करार केला आहे. पहिल्या टप्प्यात फ्रान्स भारताला 5 राफेल विमाने देत आहे. त्याची पहिली तुकडी बुधवारी भारतात दाखल होत आहे. राफेल फायटर विमानांच्या हाताळणीसाठी IAF च्या बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे.
फ्रान्समधून अंबाला एअर फोर्स स्टेशनवर येण्यापूर्वी ही राफेल विमाने यूएईमधील फ्रेंच तळावर लँडींग करतील. त्यानंतर ती पुन्हा भारताकडे झेपावतील. राफेल विमाने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहेत. राफेलमध्ये मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्स देखील आहेत. त्यामुळे शत्रूवर अचूक मारा करता येतो. चीन आणि पाकिस्तानच्या ताब्यात अद्याप राफेलच्या तोडीचे विमान नाही. येत्या 20 ऑगस्टला पारंपरिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या विमानांचा हवाई दलात समावेश करण्यात येणार आहे.