वृत्तसंस्था/ अयोध्या :
अयोध्येच्या श्री रामलल्लाचे दर्शन आता समाजमाध्यमांद्वारे करता येणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट लवकरच सकाळची मंगलआरती ते रात्रीची शयन आरतीचे थेट प्रसारण करणार आहे. दिवसभरात एकूण 5 आरत्या होतात. या सर्वांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहेत. रामलल्ला तात्पुरत्या मंदिरात विराजमान झाल्यावर उत्तरप्रदेशचे पर्यटनमंत्री नीलकंठ तिवारी यांनी दर्शन घेतले आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने संकेतस्थळ सुरू करण्यापूर्वी स्वतःचे फेसबुक आणि ट्विटर खाते वापरण्यास प्रारंभ केला आहे. संकेतस्थळावर ट्रस्टच्या बँक खात्याचीही माहिती देण्यात आली आहे. भाविक मंदिर उभारणीसाठी ऑनलाईन देणगी देऊ शकतील. राम मंदिर आणि ट्रस्टच्या नावावर बनावट खाते तयार करता येणार नसल्याचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार श्रीराम तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. 25 मार्च रोजी श्रीरामलल्लाला तात्पुरत्या मंदिरात विराजमान करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच रामजन्मभूमी येथे मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन करू शकतात. 67 एकरचा भूखंड समतल करण्यात आला आहे. या कार्यादरम्यान ब्लॅक टच स्टोनचे 7 स्तंभ, रेडसँड स्टोनचे 6 स्तंभ, 5 फुटांचे नक्षीदार शिवलिंग, देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्पकलश इत्यादी आढळून आले होते.