ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जेव्हापासून केंद्रात भाजप सरकार आले आहे, तेव्हापासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून टीका करताना दिसत आहेत. मग तो महागाईचा मुद्दा असो वा बेरोजगारीचा. त्यातच आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी कोरोना व्हायरस, बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांना घेरले आहे.

राहुल गांधी यांनी या बाबत एक ट्विट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की,
महामारी, महागाई, बेरोजगारी
हे सर्व पाहून देखील पाळले आहे मौन
जनता जाणून आहे की …याला जिम्मेदार कोण.
ट्विटच्या शेवटी हॅशटॅग वापरून लिहिले की जबाबदार कोण.
यापूर्वी देखील अनेक वेळा राहुल गांधी यांनी कोरोना महामारीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर ज्या प्रकारे तेलाचे भाव वाढले या मुद्द्यावरून देखील सरकारवर हल्ला चढविला आहे.
- ‘मनरेगा’वरून देखील सरकारवर टीका
यापूर्वी राहुल गांधी यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) वरून देखील सरकारवर टीका केली आहे. शनिवारी राहुल गांधी यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमी वर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक तंगीतून बाहेर पडण्यासाठी मनरेगा मजबूत असणे आवश्यक आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशातील गरीब जनतेला अजूनही मनरेगा योजनेमुळे दिलासा मिळत आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक तंगीतून बाहेर पडण्यासाठी या योजनेला अधिक मजबूत करण्याची गरज आहे. सरकार कोणाचेही असले तरी, जनता भारताची आहे. आणि जनतेचे हित हिच आपली जबाबदारी आहे.