ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण गुरुवारी जाहीर केले. यामध्ये रेपो रेटमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नसून रेपो रेट 4 टक्केच राहणार आहे. तर रिव्हर्स रेपो रेट 3.3 टक्क्यावर कायम राहणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.

पुढे ते म्हणाले, एमपीसीने सर्व संमत्तीने हा निर्णय घेतला असल्याने ग्राहकांसाठीच्या व्याज दरात कुठलाही बदल केला नसून, ईएमआय वरील सवलत सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात जगात आयातीवर मोठा परिणाम झाला. 2020 च्या पहिल्या सहामाहीत जागतिक अर्थव्यवस्थेत घसरण झाली. जगभरातल्या उत्पादन आणि सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. मात्र, एप्रिलच्या तुलनेत अर्थव्यवस्था हळूहळू सुधारण्यास सुरुवात झाली आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
जागतिक अर्थव्यवस्था ढासळलेली असूनही परदेशी चलनाच्या गंगाजळीमध्ये वाढ झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले, चांगल्या पावसामुळे खरीपाच्या पेरणीत वाढ झाली आहे. तसेच कोरोनावर लस आल्यास चित्र बदलू शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले.