ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्ण संख्या एवढी वाढली आहे की, आता रुग्णांना बेडची कमतरता जाणवू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी मुंबई महापालिकेने अँक्शन प्लॅन तयार केला आहे. तसेच आता कठोर कार्यपद्धती अवलंबली जाणार आहे.
- फास्टट्रॅक पद्धतीने बेड्स मिळणार
याबाबत अधिक माहिती देताना सोमवारी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, कोरोना रुग्णांना बेड वाटप करण्यासाठी दोन नोडल ऑफिसची नियुक्ती केली जाणार आहे. हे नोडल अधिकारी दुपारी 3 ते रात्री 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत काम पाहतील. तसेच वॉर रूमचे नोडल अधिकारी आणि जम्बो कोविड सेंटरचे अधिकारी एकामेकांच्या सतत संपर्कात असणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अनेक रुग्ण बरे झाल्यानंतरही बेड्स अडवतानाच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे ज्या रुग्णांना गरज नाही त्यांनी खाजगी रुग्णालयातील बेड अडवून ठेवू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी मुंबईकरांना केले आहे.
पुढे त्या म्हणाल्या, काही पंचताराकित हॉटेल्सचं कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर करण्यात येणार. खासगी डॉक्टरांकडे ही केंद्र चालवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. लक्षणे नसलेले रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होत आहे. त्यामुळे या रुग्णांना राहता येणार आहे. या हॉटेलमध्ये कोविड सेंटरसारखीच सुविधा असणार आहे. मात्र, त्यासाठी पैसे भरावे लागणार असून रुग्णांना हॉटेल निवडण्याची परवानगी देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
- गुढी पाडवा, आंबेडकर जयंती घरीच साजरी करा
उद्या गुढी पाडवा असून परवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यामुळे हे दोन्ही उत्सव घरीच आनंदाने साजरे करा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. बाबासाहेबांनी केलेली देशसेवा स्मरून आपणही घरी राहून देशसेवा करू, तेच खर अभिवादन ठरेल, असेही महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी म्हटले आहे.