प्रतिनिधी / सांगली
गेल्या तीन महिन्यापासून जिल्हय़ात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी जे प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नाला गेल्या 15 दिवसांत सुरूंग लागला आहे. 15 दिवसापासून जिल्हय़ात कोरोनाचा कहर वाढला असून रूग्णवाढीचा वेग दुप्पटीने वाढला आहे. तर चारच दिवसांत कोरोनाची रूग्णसंख्या 100 ने वाढली आहे. मणदूरनंतर जत तालुक्यातील बिळूर हे कोरोनाचे दुसरे हॉटस्पॉट बनले आहे. महापालिका क्षेत्रालाही कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. जिल्हय़ात एकूण रूग्णसंख्या 476 पार झाली आहे. शुक्रवारी नवीन 41 रूग्ण वाढले आहेत. तर सात जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शुक्रवारी जिल्हय़ात विक्रमी 41 रूग्ण वाढले
जिल्हय़ात शुक्रवारी विक्रमी 41 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये जत तालुक्यातील बिळूर येथे 24 सांगली शहरात 06, मिरज शहरात एक, आटपाडी तालुक्यातील कातरेवाडी येथे दोन, नेलकरंजी येथे एक, खानापूर तालुक्यातील विटा येथे तीन, गार्डी येथे एक, वाळवा, इस्लामपूर, करंजेवाडी येथे प्रत्येकी एक असे एकूण 41 रूग्ण वाढले आहेत.
सांगली शहरात सहा रूग्ण वाढले
सांगली शहरात गणपती पेठ येथील गुजरबोळात राहणाऱया एका 71 वर्षीय नॉव्हेल्टी दुकानदार असणाऱया व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर मिरजेच्या मिशन हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. जुना बुधगाव रोडवरील 65 वर्षीय व्यक्ती आजारी होती, त्यांच्यावर वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू असताना ही व्यक्ती या रूग्णालयातील ब्रदरच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाली आहे. कर्नाळ रोडवरील दत्तनगर येथील 25 वर्षीय गर्भवती महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे. तिचे पती हे वाहन चालक असल्याने सातत्याने बाहेर जात असल्याने त्यातून तिला बाधा झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कलानगर येथील 57 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे. शंभरफुटी रोडवरील त्या 61 वर्षीय डॉक्टरांचा शासकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेली रूग्णालयाच्या परिसरातच राहणारी 45 वर्षीय नर्स पॉझिटिव्ह आली आहे. तर मिरज शहरातील एका प्रसिध्द दवाखान्यात उपचार घेणारी 87 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे हा दवाखाना आता सील करण्यात आला आहे.
बिळूर जिल्हय़ातील दुसरे कोरोना हॉटस्पॉट
जत तालुक्यातील बिळूर हे जिल्हय़ातील दुसरे कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. याठिकाणी एकाच दिवसांत तब्बल 24 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये एका युवा नेत्यांचाही समावेश आहे. बिळूर मध्ये आतापर्यंत 50 रूग्ण झाले आहेत. शुक्रवारी 24 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये 15 पुरूष आहेत तर नऊ महिलांचा समावेश आहे. हे गाव आता संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच आजूबाजूच्या गावांचा या गावांशी संपर्क तोडण्यात आला आहे.
कातरेवाडी, नेलकरंजी, गार्डी, विटा, वाळवा येथे रूग्ण वाढले
जिल्हय़ात आटपाडी तालुक्यातील कातरेवाडी येथे दोन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये 47 आणि 35 वर्षीय महिला आहेत. नेलकरंजी येथे 55 वर्षीय व्यक्ती, खानापूर तालुक्यातील गार्डी येथे 22 वर्षीय व्यक्ती, विटा येथे हॉटेलमध्ये क्वारंटाईन असणारे दोघेजण बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये 21 वर्षीय व्यक्ती आणि 20 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तर 34 वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आला आहे. वाळवा येथे 68 वर्षीय व्यक्ती, इस्लामपूर येथील 20 वर्षीय व्यक्ती आणि करंजेवाडी येथील 22 वर्षीय व्यक्ती यांचा समावेश आहे.
शुक्रवारी सात जण कोरोनामुक्त झाले
शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 70 वर्षीय महिला, कवठेमहांकाळ येथील 55 व्यक्ती, आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील 32 वर्षीय व्यक्ती, आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी येथील 55 वर्षीय व्यक्ती, शिराळा येथील 39 वर्षीय व्यक्ती, आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील 52 वर्षीय व्यक्ती आणि पलूस तालुक्यातील आंधळी येथील 60 वर्षीय व्यक्ती यांचा समावेश आहे.
नांदणीच्या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू, तर अन्य दोघांचे अहवाल प्रलंबित
मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटल येथे कोरोनाचा उपचार सुरू असणाऱया कोल्हापूर जिल्हय़ातील नांदणी येथील एका रूग्णांचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. हा रूग्ण अत्यवस्थ असताना वॉनलेस हॉस्पिटल येथे दाखल केला होता. त्याचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीच्या मृत्यूची नोंद कोल्हापूर जिल्हय़ात करण्यात आली आहे. तासगाव तालुक्यातील येळावी येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पण तिचा अहवाल अद्यापही येणे बाकी आहे. तसेच कर्नाटक अथणी येथून आलेल्या एक रूग्णांचा सेवासदन हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचाही स्वॅब घेण्यात आला होता. पण त्याचा अहवाल अद्यापही येणे बाकी आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 476
बरे झालेले 263
उपचारात 201
मयत 12