गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराड पोलिसांच्या हालचाली
प्रतिनिधी/ कराड
गणेशोत्सव अवघ्या आठवडय़ावर आला असून उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून कराड पोलिसांनी बंदोबस्तासह हुल्लडबाजांवरील नियंत्रणासाठी तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवरच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना गणेशोत्सव काळात तात्पुरते हद्दपार करण्याच्या हालचाली पोलिसांकडून सुरू आहेत. तर ज्यांच्यावर एक, दोन गुन्हे आहेत, अशांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना पोलीस ठाण्यात आणून समज देण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या कोरोनाचे संकट आटोक्यात आल्याने कराड शहर व परिसरात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिह्यातील अनेक गावात ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून सुरू आहे. दरम्यान, कराड शहर व तालुक्यात गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनीही गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार करून त्यांना उत्सव काळात हद्दपार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सध्या कराड उपविभागातील 31 जण तडीपार आहेत. मात्र काही गुह्यातील संशयित जामिनावर बाहेर आले आहेत. अशांवर कारवाईची टांगती तलवार आहे. शिवाय अवैध व्यावसायिक, किरकोळ गुह्यातील संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रियाही सुरू झाली आहे. कराड शहर व तालुका पोलिसांची रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर करडी नजर असून त्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखाही कामाला लागली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस निरीक्षक खोबरे यांनी मंडळांसह ग्रामस्थांच्या बैठका घेऊन गणेशोत्सव काळातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात सूचना केल्या आहेत.