वार्ताहर/ गुहागर
पाळीव रेडय़ाने आपल्या मालकावर प्राणघातक हल्ला करून त्याचा जीव घेतल्याची घटना तालुक्यातील खामशेत येथे शनिवारी सायंकाळी घडली. अचानक घडलेल्या प्रकाराने रेडय़ाची दहशत या भागात पसरली असल्याचे बोलले जात आहे.
अशोक भिकाजी पालकर (60) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मालकाचे नाव आहे. आजपर्यंत आपण वन्यप्राण्याकडून माणसांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत ब्रयाच बातम्या वाचलेल्या किवा प्रत्यक्ष अशा घटना डोळ्य़ासमोर पाहिलेल्या आहेत. मात्र ज्या पाळीव प्राण्यांना आपण प्रेमाने पाळतो आणि त्यातीलच एखादा पाळीव प्राणी नकळत आपला शत्रू बनतो, असा काहीसा आश्चर्यकारक प्रकार खामशेत येथील घटनेने समोर आला आहे. खामशेत येथील शेतकरी अशोक भिकाजी पालकर यांचा पारंपरिक दुधाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे म्हशीबरोबरच एक पाळीव रेडाही आहे. हा रेडय़ाने यापूर्वी अनेकांना जखमी केले आहे.
यावेळी मात्र त्याने आपल्या मालकालाच लक्ष्य करून त्याला जागीच ठार मारल्याचा प्रकार घडला. पालकर यांनी आपली गुरे नेहमीप्रमाणे रानात चरण्यासाठी नेली होती. त्यामध्ये हा रेडाही होता. यावेळी या रेडय़ाने अचानक त्यांच्यावर हल्ला करून आपली शिंगे खुपसून त्यांना जागीच ठार मारले. यानंतर गुरांसह हा रेडाही आपल्या मालकाच्या घराकडे आला.
रुग्णालयात नेण्याआधीच ओढवला मृत्यू
हा घडलेला प्रकार लोकांना कळल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पालकर यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्नही झाला. मात्र त्यांचा मृत्यू अगोदरच झाला होता. या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत पालकर यांचे शवविच्छेदन करण्यात आले.