प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाची बाधा झाल्यानंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये. राज्यात औषधांची कमतरता नाही. कोरोना थोपविण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. आपल्याकडे रेमडेसिवीरच्या 30 हजार बाटल्या शिल्लक आहेत. आणखी 84 हजार बाटल्या खरेदीसाठी निविदा मागविल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी कोरोना नियंत्रणासंबंधी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजिण्यात आली होती. बैठकीनंतर आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, सरकारी इस्पितळांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. 5 हजार ऑक्सिजन सिलिंडर्स पुरवठा करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. मागील वर्षीप्रमाणे जंबो ऑक्सिजन सिलिंडर्स खरेदीसाठी औद्योगिक खाते सहकार्य करणार आहेत, असे ते म्हणाले.