रेल्वेप्रवास अधिक आरामदायी करण्याची योजना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय रेल्वे सर्वसामान्यांचा रेल्वेप्रवास अत्यंत आरामदायी करण्याची योजना आखत आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वेप्रवासाचा अनुभवच बदलणार आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत रेल्वे वातानुकुलित जनरल सेकंड क्लास कोच सादर करणार आहे. इकॉनॉमी एसी 3-टीयर डबा आणल्यावर रेल्वे आता अनारक्षित द्वितीय शेणी डब्याला वातानुकुलित करण्याची तयारी करत आहे. याचबरोबर रेल्वे अनेक बदल घडवून आणत सर्वसामान्यांना अनेक सुविधा पुरविणार आहे.
हे नवे वातानुकुलित एसी जनरल सेकंड क्लास कोच कपूरथळा येथील रेल्वेच्या प्रकल्पात निर्माण करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प भारतात सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवासाचा चेहरामोहराच बदलून ठेवणार आहे. वातानुकुलित द्वितीय शेणीच्या डब्यातील प्रवास अत्यंत आरामदायी होणार आहे. एसी जनरल डब्याचे डिझाइन ठरले असून चालू वर्षाच्या अखेरपर्यंत हे डबे रुळावरून धावू लागतील असे उद्गार रेल्वे प्रकल्पाचे महाव्यवस्थापक रविंद्र गुप्ता यांनी काढले आहेत.
130 किमीच्या वेगाने धावणार
सद्यकाळात जनरल सेकंड क्लास डब्यात सुमारे 100 प्रवासी सामावू शकतात. या डब्यांच्या निर्मितीकरता सुमारे 2.24 कोटी रुपयांचा खर्च येतो. नव्या जनरल सेकंड क्लास डब्यात याहून अधिक प्रवासी सामावू शकतील तसेच उत्तम सुविधाही असणार आहे. हे डबे दीर्घ अंतराच्या मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाडय़ांना जोडण्यात येणार असून ते 130 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावू शकतील. विनावातानुकुलित डबे 110 किलोमीटर प्रतितासापेक्षा अधिक वेगाने धावू शकत नाहीत.
निर्मितीला वेग मिळणार
भारतीय रेल्वेगाडय़ांचा वेग 130 किलोमीटर प्रतितास करण्यासाठी त्यात आवश्यक बदल केले जात आहेत. यांतर्गत स्लीपर आणि जनरल डब्यांमध्ये वातानुकूलन यंत्रणा बसविण्यात आली आहे. अलिकडेच रेल्वे कोच प्रकल्पाने इकॉनॉमी एसी 3-टीयर कोच सादर केले होते. हे डबे मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाडय़ांमध्ये स्लीपर क्लासच्या जागी जोडले जात आहेत. इकॉनॉमी एसी डबे 180 किलोमीटर प्रतितासाच्या वेगापर्यंत धावू शकतात.