प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊननंतर प्रवासी रेल्वेचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने महसूल वाढविण्यासाठी रेल्वे विभागाने पार्सल रेल्वे सुरू केली. नैर्त्रुत्य रेल्वे विभागाने देशाच्या विविध भागात पार्सल रेल्वे सुरू केल्या. यामध्ये हुबळी विभागाने बाजी मारली असून, ऑक्टोबर महिन्यात 1 कोटी 17 लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक नसतानाही रेल्वेला पार्सलच्या माध्यमातून महसूल उपलब्ध होऊ लागला आहे.
ऑक्टोबर हा महिना उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो. कर्नाटकात दसरा हा सण मोठय़ा उत्साहात साजरा केला जात असल्यामुळे बाजारात उलाढाल होते. याचाच फायदा रेल्वे विभागाने घेतला. मोठय़ा औद्योगिक कंपन्यांशी संपर्क साधुन मालवाहतुकीला चालना दिली. सुरक्षित व कमी वेळेत मालवाहतूक होत असल्यामुळे पार्सल रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
सन 2020-21 या आर्थिक वर्षात नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने 3 कोटी 23 लाखाचा महसूल जमा केला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात 1.17 कोटीचा महसूल जमा झाला आहे. पार्सल सेवेतून मिळालेला हा आतापर्यंतचा सर्वात जास्त महसूल आहे. नैर्त्रुत्य रेल्वे विभागातून एकूण 26 पार्सल रेल्वे धावल्या. त्यामधून 30 हजार क्विंटल साहित्याची वाहतूक करण्यात आल्याची माहिती नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाचे विभागीय अधिकारी अरविंद मालखेडे यांनी दिली आहे..