1000 हून जास्त स्टेशनवर द्यावा लागणार युजर चार्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नजिकच्या काळात रेल्वे प्रवाशांना प्रवास करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. विमानतळांसाठी असणाऱया युजर चार्जप्रमाणे काही रेल्वे स्थानकांवरही युजर चार्ज आकारला जाणार असल्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी विनोदकुमार यादव यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच काही मार्गांवर चालविल्या जाणाऱया खासगी गाडय़ांचे भाडे ठरविण्याचा अधिकार कंपन्यांना मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झाल्याने रेल्वे तिकिटांचे दर वाढण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
रेल्वेने जाहीर केल्यानुसार देशातील एकूण रेल्वेस्थानकांपैकी 10 ते 15 टक्के स्थानकांवर युजर चार्ज आकारला जाणार आहे. या स्थानकांमध्ये विशेषतः गर्दीची स्थानके असणार आहेत. सध्या देशात भारतीय रेल्वेची सुमारे 7,000 स्थानके आहेत. यापैकी जवळपास 1,050 स्थानकांवर प्रवासी ‘फुटफॉल’ वाढवला जाईल. ‘फुटफॉल’मध्ये वाढ झाल्याने स्थानकांची क्षमता वाढविण्यासाठी, त्याची पुनर्रचना करण्यात येईल. तसेच या स्थानकांवर युजर (वापरकर्ता) शुल्क घेतले जाईल.
सीआरबीचे व्ही. के. यादव यांनी माहिती दिली आहे की लवकरच लोकल शुल्काबाबत रेल्वे अधिसूचना जारी करणार आहे. मात्र, युजर चार्ज किती असेल या प्रश्नावर स्पष्टोक्ती देताना ही रक्कम थोडी असेल असे ते म्हणाले. प्रवासी भाडय़ाचे तिकीट जोडून प्रवाशांकडून हे शुल्क आकारले जाईल. तसेच 24 मार्चपर्यंत डबलिंग, ट्रिपलिंग आणि विद्युतीकरण उच्च घनतेच्या मार्गावर पूर्ण केले जाईल. डिसेंबर 2020 पर्यंत गांधी नगर आणि हबीबगंज स्थानकांचा पुनर्विकास होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खासगी रेल्वेंचे तिकीट कंपन्या ठरवणार?
पुढील काही दिवसांमध्ये देशात खासगी रेल्वे सुरू होणार आहेत. या रेल्वेंचे तिकीटभाडे महाग असण्याची शक्मयता आहे. विमान कंपन्यांच्या धर्तीवर खासगी कंपन्यांच्या रेल्वे गाडय़ांना त्यांच्या तिकिटाचे दर निश्चित करण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती भारत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी सांगितले. परंतु त्या मार्गावर एसी बसेस किंवा विमानांची सुविधा असेल तर तिकिटाचे दर निश्चित करण्यापूर्वी ही बाब ध्यानात घ्यावी लागणार आहे.