रेल्वेचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक पी. के. रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे नेहरुनगर येथे वाहतूक कोंडी : कोल्हापूर सर्कलपासून केएलईपर्यंत वाहनांच्या रांगा
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत कोल्हापूर सर्कल ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. यामुळे बुधवारी सकाळपासूनच या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. एकाच मार्गे दुहेरी वाहतूक केली जात असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. त्यामुळे केएलईपासून चन्नमा चौकात येईपर्यंत अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी लागत होता. इतकी वाहतूक कोंडी होऊनही रहदारी पोलीस नियुक्त न केल्यामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त केला जात होता.
राष्ट्रीय महामार्गापासून रामदेव हॉटेलपर्यंतच्या रस्त्याच्या एका बाजूच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले होते. परंतु दुसऱया बाजूचे काम मात्र मागील दोन महिन्यांपासून रखडत चालले होते. यामुळे वारंवार वाहतुक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत होते. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रिटीकरण लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात होती.
मंगळवारपासून काँक्रिटीकरण करण्यासाठी तयारी करण्यात येत होती. बुधवारी सकाळपासून कोल्हापूर सर्कल येथून काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. राष्ट्रीय महामार्गावरून शहरात येणारा हा प्रमुख मार्ग असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. केएलई हॉस्पिटलकडे जाणाऱया रुग्णांनाही या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. त्यातच काही ठिकाणी रस्त्याशेजारी करण्यात आलेल्या बेशिस्त पार्किंगमुळे कोंडीमध्ये भर पडत होती.
परिवहनच्या बस अडकल्या कोंडीत
मध्यवर्ती बस स्थानकातून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱया बस कोल्हापूर सर्कलमार्गे मार्गस्थ होतात. बुधवारी झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये बस अडकून पडल्या होत्या. यामुळे परगावी जाणाऱया प्रवाशांना उशीर होत होता. काही चालकांनी वाहतूक कोंडी पाहून इतर मार्गांनी महामार्गाकडे गाडय़ा वळविल्या.