‘कोरोना’मुळे मिळाली जास्त प्रसिद्धी, काढा करून पिण्याकडे ग्रामीण भागांबरोबर शहरी भागांमध्येही कल
प्रसाद तिळवे / सांगे
सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकडे लोकांचा कल असल्याचे दिसून येते. त्यासाठी विविध औषधे घेतली जात आहेत. तसेच ग्रामीण भागांबरोबर शहरी भागातही सध्या उपलब्ध होणारी ‘गिलोय’ म्हणजेच ‘गुळवेल’ किंवा ‘अमृतवेल’ या वनस्पतीचा काढा तयार करून त्याचे सेवन केले जात आहे.
या वालीला हृदयाच्या आकाराची पाने असतात, म्हणून कॉर्डिफोलिया हे नाव पडले. उष्ण प्रदेशात आढळणाऱया या वनस्पतीस गुडुचीसह अन्य काही नावांनिही ओळखले जाते. गुळवेलला आयुर्वेदात फार महत्त्व असून अमृता हे नाव दिले आहे. या नावाप्रमाणे ही वनस्पती आहे. जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही ही वनस्पती जिवंत राहते. भारतातील सर्व भागांमध्ये ही वनस्पती सहज आढळते. या वनस्पतीच्या उपयोगासंदर्भात विविध ऋषींनी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बरीच माहिती लिहून ठेवलेली आढळते.
महामारीनंतर समाजमाध्यमांवर प्रसिद्धी
गोव्यातही ही वनस्पती जंगलात तसेच काजूच्या बागेत सहज उपलब्ध होते. कोरोनाने डोके वर काढल्याने समाजमाध्यमावरून गेल्या बऱयाच दिवसांपासून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ही वनस्पती अत्यंत लाभदायक असल्याचे व्हिडीओ प्रसारित होऊ लागले आहेत. त्यामुळे या वनस्पतीचा काढा घेण्याकडे सर्व थरांतील लोकांचा कल वाढलेला दिसून येतो. या वनस्पतीच्या खोडाचा वापर औषधात केला जातो. चवीला ते कडू, तुरट आणि किंचित गोड असते. आपल्याकडे गावठी औषधे देणाऱयांना या वनस्पतीबद्दल माहिती होती. मात्र आता कोरोनामुळे ती खूपच प्रसिद्ध झाली आहे.
या वेलीचा अगदी लहान तुकडा काढा करण्यासाठी वापरायचा असतो. अमृतवेल प्रतिरोधकतेला चालना देते. मधुमेह, डेंग्यू, संधिवात, यकृताचे विकार, ताप, दमा, अल्सर, त्वचेच्या जखमा, कॉलेस्टरोलची समस्या, चिंता आणि तणाव, कर्करोग आदींवर ती गुणकारी मानली जाते. प्रतिजैवक म्हणूनही ती वापरले जाते. या वनस्पतीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. या वनस्पतीचा सहभाग असलेली अनेक आयुर्वेदिक औषधे बाजारात उपलब्ध आहेत. रक्तशर्करा कमी करणारा पदार्थ या वनस्पतीमध्ये असल्याने जर कोणी मधुमेहाचे रुग्ण असेल व औषधे घेत असेल, तर गिलॉय घेण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गरोदर असलेल्या वा स्तनपान करणाऱया स्त्रियांनाही आधी सल्ला घेण्यास सूचविले गेलेले आहे. सध्या अमृतवेल सर्वत्र प्रसिद्ध झाली असून या वनस्पतीचा काढा करून पिण्याचे प्रकार ग्रामीण भागात तर खूपच होत आहेत. शहरी भागही याला अपवाद नाही.
योग्य प्रमाणात सेवन केल्यास गुळवेलचे उत्तम परिणाम : डॉ. बोंद्रे

यासंदर्भात कुडचडे येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर मिथुन बोंद्रे यांना विचारले असता ते म्हणाले की, गुळवेल हे आयुर्वेदात तापावर अत्यंत उपयुक्त असे औषध सांगितले आहे. कोविड-19 चे ताप येणे हे एक लक्षण आहे. त्यामुळे गुळवेलचे सेवन केल्यास उत्तमच आहे. यामध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याची क्षमता आहे. तसेच बरेच गुणधर्म आहेत. अपचन होऊन ताप आल्यास गुळवेलपासून बनविलेले औषध दिले जाते. ज्या रुग्णामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी आहे तसेच पित्त कमी आहे, हात-पाय थंड पडतात, चक्कर येते, ज्यांचा आहार कमी असतो, जे खूप व्यायाम करतात त्यांनी कमी प्रमाणात गिलॉयचे सेवन करावे.

सहज उपलब्ध होत असल्याने खूप सेवन केल्यास वाईट परिणाम होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. मुळात गिलॉय हे कडू असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते. आपल्याकडे नव्वद टक्के रुग्ण हे साखरेचे प्रमाण जास्त असलेले आढळून येतात. मात्र दहा टक्के साखरेचे प्रमाण कमी असलेले असतात. त्यांनी गुळवेलचे सेवन करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. या वनस्पतीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्याचा परिणाम अमृतासारखा आहे. ते रक्त शुद्ध करते तसेच पचनक्रिया सुधारते. गुळवेल गोळय़ांच्या तसेच गिलॉय टी, रस, चूर्ण, काढा करण्यासाठी खोड, कसाय इत्यादी रूपात बाजारात उपलब्ध आहे. योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणात गुळवेलचे वैद्याच्या निरीक्षणाखाली सेवन करावे, असा सल्ला डॉ. बोंद्रे यांनी दिला.