आपला देश जसा वैविध्यतेने नटलेला आहे तसाच तो विरोधाभासाने भरलेला आहे. असा विरोधाभास सातत्याने नजरेसमोर येत असतो. विकास दरात घसरण झाली की बेरोजगारीचा उच्चांक निर्माण होतो हे तर निश्चितच. सरलेल्या नोव्हेंबर महिन्यात बेरोजगारीचा दर विक्रमी आठ टक्क्मयांवर गेला असून तो गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक दर असल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनोमीने आपल्या अहवालात म्हटले आहे. सप्टेंबरमध्ये 6.43 तर ऑक्टोबरमध्ये 7.77 टक्के असलेला बेरोजगारीचा दर वाढून 8 टक्क्यावर पोहोचला. ग्रामीण भागापेक्षा सुद्धा शहरी भागातील परिस्थिती बिकट आहे तेथे बेरोजगारीचा दर 8.96 टक्के आहे तर ग्रामीण भागात तोच 7.55 टक्के आहे असेही आकडेवारी सांगते. वैशिष्टय़ म्हणजे छत्तीसगड मध्ये सर्वात कमी म्हणजे 0.1 टक्के आणि उत्तराखंड मध्ये 1.2 टक्के तर ओडिशामध्ये 1.6 टक्के बेरोजगारी आहे. महाराष्ट्रात नोव्हेंबर मध्ये साडेतीन टक्के तर शहरी भागात 4.8 टक्के तर हरियाणा, राजस्थान, बिहारमध्ये सर्वाधिक बेरोजगारी असून हरियाणात 30.6 टक्के, राजस्थानात 24.5 टक्के, जम्मू काश्मीरमध्ये 23.9 टक्के, बिहार 17.3 टक्के आणि त्रिपुरा 14.5 टक्के इतकी बेरोजगारी असल्याचा अहवाल समोर आला आहे. झारखंड, आसाम, गोवा, दिल्ली ही राज्ये 13 ते 14 टक्क्मयांमध्ये तर आंध्र, हिमाचल, पंजाब, मध्य प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश ही नऊ ते चार टक्के बेरोजगारी दर असणारी राज्ये आहेत. आता या आकडेवारीने कोणी उसळून उठेल असे मानण्याचे कारण नाही. पण स्थानिक पारंपरिक उद्योग धोक्मयात असल्याची ही चिन्हे आहेत. जगण्याच्या धडपडीत असणारा प्रत्येक जण आपल्याला रोजगार मिळाला नाही तरीसुद्धा त्या विरोधात आवाज उठवण्याच्या क्षमतेचा राहिलेला नाही हे वास्तव आहे. हे वास्तव आकडेवारी कमी, जास्त झाल्याने फारसे बदलत नाही. कारण, रोजगार हा रोजगार असतो ती काही हक्काची नोकरी नव्हे. शिक्षण, संधीची असमानता, आणि अनेक कारणांमुळे देशातील खूप मोठय़ा लोकसंख्येला शाश्वत नोकरीला मुकावे लागत आहे. त्यांना कुणातरी मेहरबानीवर आणि मिळेल त्या रोजगारावर काम करण्याखेरीज गत्यंतर नाही. मिळेल ते काम आणि पडेल ती जबाबदारी पार पाडण्यासाठी लोक तू-मी करतात. उत्तर भारतात पर्यटनवाढीच्या या दिवसात एकेका पर्यटका मागे वीस, पंचवीस रिक्षावाले आपल्याच वाहनातून प्रवास करा म्हणून लागतात. हे देशाचे चित्र बदलायला तयार नाही. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या भागात रस्त्याकडेला वाढणाऱया झोपडय़ा आणि गरज नसतानाही येऊन आदळणारी प्रचंड मोठी बेरोजगारांची लोकसंख्या आज ना उद्या उपासमार टळेल आणि हाताला काम मिळेल या भरवशावर आपले गाव सोडून शहरात येतच आहे. हिंदी भाषिक पट्टय़ातील जनता तर या मोठय़ा शहरांचा नाद सोडून ग्रामीण भारतात सर्वत्र मिळेल तिथे, पडेल ते काम करण्याची तयारी दर्शवून फिरताना दिसत आहे. आपल्या हक्काचा रोजगार सुद्धा हे लोक फिरवून घेत आहेत असे त्यांच्या नावाने बोटे मोडत इथले स्थानिक आपल्याला पचेल, रुचेल अशा पद्धतीने रोजगार आणि पगाराची मागणी करत संधीची वाट पाहत कुढत बसलेले दिसत आहेत. नोकऱयांची आणि कायम होण्याची शक्मयता धूसर होण्याचा काळ सुरू असताना आजही लोक त्या सुखाच्या कल्पनेमागे धावताना दिसतात. सरकारी नोकर भरती निघेल, खाजगी उद्योगात नोकरी मिळेल, मोठय़ा कंपन्यांचे पॅकेज मिळेल किंवा परदेशात गरज आहे म्हणून संधी मिळेल या आशेवर अनेक जण नोकरीचा शोध घेत असतात. या सर्वांमध्ये काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक भाग्यवानही असतात. अशाच भाग्यवानांमध्ये आयआयटीमध्ये शिकणाऱया विद्यार्थ्यांची गणना होऊ शकते. सव्वाशे कोटीहून अधिक लोकसंख्या असणाऱया आपल्या देशात गेल्या वषी 470 आयआयटीच्या विद्यार्थ्यांना कॅम्पस मधून नोकरी मिळाली होती. यंदा त्या संख्येत दहा टक्क्मयांनी म्हणजे जवळपास 50 इतक्मया संख्येने वाढ झाली आहे. या पाचशे, सव्वापाचशे विद्यार्थ्यांपैकी अनेकांना वार्षिक एक कोटी पेक्षा जास्तच्या पॅकेजच्या ऑफर्स मिळाल्या आहेत. ऐटीत जगायचे तर ’आयटी’त शिकायचे, या म्हणीत आधीपासूनच आयआयटीत शिकायचे हे सुद्धा अंतर्भूत होतेच! यंदाच्या तीस विद्यार्थ्यांना कोटय़वधी रुपयांचे पगाराचे पॅकेज मिळाले आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजीनियरिंग, डेटा सायन्स, कोअर इंजिनिअर, यु एक्स डिझायनर, व्हीएलएसआय, व्हेईकल इंजिनिअरिंग, प्रॉडक्ट डिझाईनिंग अशा क्षेत्रामध्ये भारतीय विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळालेल्या आहेत. मायक्रोसॉफ्ट, टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स, गुगल, उबेर, ट्रायकॉम, सी डॉट अशा अनेक ठिकाणी भारतीय विद्यार्थ्यांनाही संधी मिळाली आहे. अवघ्या पाचशे युवकांना ही संधी मिळणार असली तरीसुद्धा त्यामुळे भारतीय शिक्षणाच्या बाजारपेठेत मात्र नव्याने स्वप्न दाखवण्याचा बाजार तेजीत चालणार आहे. दहावी शिकल्यानंतर अकरावी, बारावी सायन्स करणाऱया विद्यार्थ्यांना आयआयटी आणि आयआयएमचे स्वप्न दाखवून विद्यार्थ्यांचे संपूर्ण कोचिंग करण्याचा दावा करणाऱया आणि त्यांना चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळवण्याचे स्वप्न दाखवणाऱया छोटय़ा मोठय़ा इन्स्टिटय़ूटद्वारे अनेकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यांचे विद्यार्थी यशस्वी होवोत किंवा न होवोत, यंदाच्या वषी एक कोटीचे स्वप्न दाखवायला त्यांना खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यातूनही ज्या विद्यार्थ्यांना यश मिळते त्यांच्यामुळे अशा क्लास आणि संस्थाचालकांचे उखळ पांढरे झाल्यावाचून राहत नाही. पालक नावाचा पिचलेला वर्ग आपल्या मुलांच्या स्वप्नांच्या मागे धावताना आपण रोजगारी आहोत की नोकरदार याचाही विचार न करता कर्जाचे डोंगर उपसून मुलांच्या स्वप्नपूर्ती मागे धावू लागतो. प्रसंगी उपाशी राहतो, कर्जबाजारी होतो, स्वतःची स्वप्नं, गरजा यांना पुरून टाकून पुढच्या पिढीचा रस्ता प्रशस्त करण्याचा प्रयत्न करतो. मात्र बेरोजगारी किंवा बेकारी या मोठय़ा लोकसंख्येचा पिच्छा सोडत नाही. आकडेवारी पुढे मागे झाली तरी हे वास्तव बदलत नाही कारण दुर्दैवाचे दशावतार संपत नाहीत.
Previous Articleपुणे मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचीच बाजी
Next Article 1.8 कोटी उंदरांमुळे न्यूयॉर्क त्रस्त
Related Posts
Add A Comment