आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू ; संजय राऊतांच्या भाजपवर निशाणा
ऑनलाईन टीम/ तरुण भारत
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चर्चा झाली ती राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सदर केलेल्या पेनड्राईव्हची. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्हच्या माध्यमातून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. गुरुवारी फडणवीसांनी विधानसभेत आणखी एका नव्या पेनड्राईव्हचा उल्लेख करत मुंबईचे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, दाऊदनंच यांना सुपारी दिली आहे की काय, असा दावा देखील राऊतांनी केला.
दरम्यान, राज्यातील नेत्यांवर होत असलेल्या कारवाईबाबत पुढे राऊत म्हणाले की, ‘या कू पद्धतीच्या, घाणेरड्या पद्धतीच्या कारवाया होत आहेत. याला पद्धत म्हणत नाहीत, तर याला सूड, बदलाची भावना असून याच्याशिवाय या कारवायांना दुसरा शब्द वापरता येणार नाही. आतापर्यंत महाराष्ट्रात नीच आणि इतक हलकट पातळीवरच राजकारण कधीच झाले नाही. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या शत्रूशी सन्मानाने वागण्याचा सल्ला दिला होता. तसेच महाराष्ट्रातील साधूसंतांचा, देवदेवतांचा असा एक संदेश, मंत्र आहे की, शत्रूविषयी सन्मानाने वागले पाहिजे. आम्ही काय पाकिस्तानमधून आलोय? उलट तुमचे संबंध आहेत. यांच्या घरात पेनड्राईव्ह रोज बाळंत होतात का? हे बघाव लागेल. हा पेनड्राईव्ह, तो पेनड्राईव्ह आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू. नुसत बोंबलून चालत का? रोज एक खोटे, भपंक प्रकरण तयार करतात. हे बाळंतपण कसे काय यांना जमते माहित नाही. महाराष्ट्रात हे नवीन आहे. देशाच्या वैद्यकीय क्षेत्रात रिसर्च करण्यासारखी गोष्ट आहे. तुमच्या १०० पेनड्राईव्हनंतर आमच्या एक कव्हर ड्राईव्ह येईल तो तुम्हाला भारी पडेल.’