वार्ताहर / हिंडलगा
संततधार पावसामुळे भिंतीमध्ये पाणी झिरपून राहते घर कोसळण्याची घटना रविवार दि. 16 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रामघाट मेन रोड, लक्ष्मीनगर, गणेशपूर येथे घडली. घरातील सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतानाच ही घटना घडली. पण सुदैवानेच सर्वजण बाहेर आल्याने जीवितहानी टळली
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे लक्ष्मीनगर, गणेशपूर येथील रहिवासी यशोदा तुकाराम देसाई यांच्या घराच्या भिंतीमध्ये मोठया प्रमाणात पाणी झिरपले होते. मातीचे बांधकाम असल्याने संपूर्ण घर कमकुवत बनले होते. तरीदेखील त्याच घरामध्ये पाच जणांचे कुटुंब वास्तव्यास आहे. पण रविवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्वजण नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करण्यासाठी बसले असता अचानक घराची समोरील व एका बाजूची भिंत कोसळण्यास सुरुवात झाली. क्षणाचाही विलंब न करता सर्वजण जेवणाचे ताट सोडून घराबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. पण राहते घरच कोसळल्याने संसारोपयोगी साहित्य खराब झाल्याने देसाई कुटुंबीयांना सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय सध्या शिल्लक असलेल्या भिंतीदेखील कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून कुटुंबीयांना निराधार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हिंडलगा ग्राम पंचायत व शासनाने त्वरित पाहणी करून नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.