ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथे लखनऊ-आग्रा महामार्गावर आज सकाळी झालेल्या बस आणि कारच्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस बिहारहून दिल्लीकडे निघाली होती. या बसमधून 40-45 लोक प्रवास करत होते. दरम्यान, आज सकाळी कन्नौजच्या सौरीख जवळ समोर उभ्या असलेल्या एका कारला भरधाव वेगातील बसने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही अपघातग्रस्त वाहने महामार्ग सोडून खाली गेली. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य हाती घेत बसमधील जखमी आणि मृतांना बाहेर काढले. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर 18 जण जखमी आहेत.
अपघातामधील जखमींना कन्नौज येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि इटावा येथील सैफई येथे दाखल करण्यात आले आहे. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.