वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नोव्हेंबर महिन्यातील संयुक्त अरब अमिरात येथील आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱयावर येणार आहे. या उभय संघातील कसोटी सामन्याचे यजमानपद लखनौ भूषविणार आहे.
2016 साली उत्तरप्रदेश क्रिकेट संघटनेच्या नव्या स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले होते. न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱयात दोन कसोटी सामने खेळणार आहे. यापैकी पहिली कसोटी लखनौमध्ये तर दुसरी कसोटी बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित केली आहे.
लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमची क्षमता 70 हजार प्रेक्षकांची असून या स्टेडियममध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. कसोटी मालिका संपल्यानंतर भारत-न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात खेळविली जाणार आहे. येत्या फेब्रुवारी-मार्च दरमयान भारतöश्रीलंका यांच्यात दोन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहेत.