मिरज / प्रतिनिधी :
लग्नाचे आमिष दाखवून मिरजेतील एका उच्चशिक्षीत तरुणीला बँकेतून कर्ज काढायला लावून सुमारे सहा लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मोहंमद मुजाहीद महमुद खान ( रा.यकुदपुरा, हैद्राबाद) आणि ओबेद अशा दोघांवर मिरज शहर पोलीसांत पिडीत तरूणीने फिर्याद दिली आहे.
पिडीत तरुणी ही वैद्यकीय औषध प्रतिनिधी म्हणून काम करते. तिची हैद्राबाद येथील मोहंमद मुजाहिद या तरूणाशी २०१९ मध्ये ओळख झाली. यातून त्याने संबंधीत तरूणीला विश्वासात घेतले. लग्नाचे अमिष दाखवले. त्यानंतर त्याने चारचाकी घेण्यासाठी पैसे हवे असल्याचे सांगत सदर तरूणीच्या नावावर बँकेतून कर्ज काढण्यास सांगितले. त्याचे हप्ते आपण प्रत्येक महिन्याला फेडू असा विश्वास ही त्याने दिला. त्यामुळे सदर तरूणीने सहा लाख ५० हजार रूपये कर्ज काढले. ते संशयीत मोहंमद मुजाहीद याने कार शोरूमचा मालक आबेद याच्या खात्यात भरले. त्यानंतर सदर तरुणीच्या खात्यात कर्जाच्या हप्त्यापोटी एक लाख, ७३ हजार भरले. त्यानंतर त्याने हप्ते भरणे बंद केले. त्यामुळे सदर तरुणीला बँकेकडून हप्ते भरण्यासाठी तगादा येऊ लागला. सदर संशयीत तरुणाकडे पैसे मागितले, असता असमर्थता दर्शवली. नंतर त्याने फोन घेणे ही बंद केले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तरूणीच्या लक्षात आले. तिने संबंधीत मोहंमद मुजाहिद आणि कार शोरूमचा मालक आबेद या दोघांविरोधात शहर पोलीसांत फिर्याद दिली आहे.