उच्च दर्जाच्या अत्याधुनिक स्फोटक पदार्थांमध्ये नायट्रो ऍरोमॅटीक रसायनांचा उपयोग केलेला असतो. या रासायनिक पदार्थांचा मागोवा घेणे अवघड मानले जाते. तथापि भारतीय संशोधकांनी या समस्येवर मात करताना असे उपकरण शोधून काढले आहे की जे अशा अत्याधुनिक स्फोटकांचा शोध घेण्यास सक्षम आहे. ही स्फोटके कुठेही लपविलेली असली तरी या उपकरणाच्या तावडीतून सुटत नाहीत.
हे उपकरण म्हणजे थर्मली स्टेबल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनविलेल्या इलेक्ट्रॉनिक पॉलिमर सेन्सर आहे. या सेन्सरमुळे कोणत्याही अत्याधुनिक स्फोटकाचा अचूक वेध अत्यंत कमी वेळेत घेता येऊ शकतो. हा सेन्सर दुधातही उपयोगात आणला जाऊ शकतो. तसेच जमिनीत पुरलेले सुरंग, हातबॉम्ब किंवा अन्य प्रकारची स्फोटके शोधून काढू शकतो. याला पॉलिमर गॅस सेन्सर असेही म्हणतात. अशा तऱहेचे सेन्सर अनेक वर्षांपासून उपलब्ध आहेत. तथापि या नव्या सेन्सरचे तंत्रज्ञान भिन्न असून कार्यपद्धती वेगळी आणि अधिक प्रभावशाली आहे.
सध्या उपलब्ध असणाऱया सेन्सरमधील त्रुटी दूर करण्यासाठी हे उपकरण तयार करण्यात आले आहे. इन्स्टिटय़ूट ऑफ ऍडव्हान्सड् स्टडी इन सायन्स अँड टेक्नालॉजी या गुवाहाटी येथील संस्थेने हे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे.