सहा दहशतवाद्यांना पुलवामा येथे अटक : सुरक्षा दलाची मोठी कारवाई
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीर पोलिसांनी पुलवामा येथे लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे सर्व दहशतवादी स्वतंत्र मॉडय़ूल चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले. हे दहशतवादी दहशतवाद्यांना पैसा-रसद पुरवणे, आश्रय देण। तरुणांना प्रशिक्षण करणे आणि दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे आदी कारवायांमध्ये सक्रियपणे वावरत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ात शुक्रवारी लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) मॉडय़ूलचा पर्दाफाश केल्यानंतर सहा कथित दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. रौफ अहमद लोन उर्फ अमजीद, आकिब मकबूल भट, जावेद अहमद दार, अर्शीद अहमद मीर, रमीझ राजा आणि सज्जाद अहमद दार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण दहशतवादी कमांडर रियाझ अहमद दार उर्फ खालिदसाठी काम करत असल्याची माहिती स्पष्ट झाली आहे. रियाझ दार हा पुलवामामधील सेदरगुंड काकापोरा येथील रहिवासी असून तो लष्कर-ए-तोयबाचा सक्रिय कमांडर आहे. दार यांच्या निर्देशानुसारच अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी जिह्यात दहशतवादी कारवाया चालवल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.