गणेशोत्सव हे समाज जागृतीचे माध्यम आहे ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची शिकवण खरी करणारा निर्णय मुंबईतील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे. कोरोनाचे संकट आणि भक्तांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी मूर्तीच न बसविण्याचा आणि उत्सव साजरा न करण्याचा निर्णय तसा धाडसी होता. पण, तो घेतानाच यावर्षी रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेशन कॅम्प घेऊन गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा आरोग्यदायी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गलवान खोऱयातील हुतात्म्यांबरोबरच कोरोना युद्धातील हुतात्मा पोलीस, डॉक्टर आरोग्य कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांचा योग्य मान-सन्मान आणि हातभार लावण्यास मंडळ प्रथम प्राधान्य देणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री निधीलाही मंडळ 25 लाख रु. देऊ करणार आहे. हा निर्णय घेणारे लालबाग परळ परिसरातील कोळी बांधव हे या मंडळाचे कार्यकर्ते आहेत. त्याअर्थाने मुंबईच्या मूळ रहिवाशांचा हा स्तुत्य निर्णय आहे. गणरायाची आकर्षक भव्य मूर्ती आणि त्याच्या दर्शनाला येऊन नवस बोलणारे सेलिब्रिटी ही या मंडळाची ख्याती आहे. तातडीने दर्शन मिळावे यासाठी काही वशिला लागतो का याचीही चाचपणी भलेभले करतात. सर्व टीव्ही चॅनेल्स, वृत्तपत्रांना या ठिकाणी आपल्या प्रतिनिधींची संपूर्ण उत्सव काळात उपस्थिती अत्यावश्यक वाटत असते. रांगेतून 24 ते 40 तासही दर्शनाला लागू शकतात. त्यातून प्रचंड गर्दीत कधी माध्यम प्रतिनिधी तर कधी पोलिसांशी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मतभेद होतात. लालबागचा राजा अशा प्रकारे कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहतो. या गणरायाचा हात सदैव आशीर्वादासाठी उंचावलेला आहे. दूरदूरहूनही त्याचे दर्शन होते. अरुंद अशा एका गल्लीत असलेल्या या जगप्रसिद्ध गणरायाला अगदी जवळून पाहण्यासाठी आणि त्याच्या अवाढव्य पायाजवळ माथा टेकण्यासाठी भल्याभल्यांची चढाओढ लागलेली असते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये मंडळाची जर बदनामी झाली असेल तर ती क्षम्यच ठरावी. मात्र तरीही ती प्रसिद्ध मंडळाची असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करायचे म्हटले तरी होत नाही. पण, याच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे कौतुकास्पद कार्य केले आहे. दारात केवळ दर्शनासाठी लाखोंची रीघ असते त्या मंडळाने मूर्तीच न बसविण्याचा निर्णय आषाढी एकादशीच्या दिवशी घेण्यालाही मोठे महत्त्व आहे. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आषाढी, कार्तिकीला भक्तांचा जनसागर उसळलेला असतो. तसेही आता पांडुरंगाचे दर्शन हे दररोजसाठीच गर्दीचे ठरले आहे. पण, तरीही या दोन एकादशींना होणारी गर्दी ही परंपरागत आहे. वारीच्या या परंपरेला वारकरी सांप्रदायाने कोरोनामुळे मुरड घातली. विविध फडांच्या प्रमुखांनीही या संकटाचे गांभीर्य जाणून पालखी न काढण्याचा आणि पायी वारी न करण्याचा निर्णय घेतला आणि तो तंतोतंत अमलात आणला. ज्यामुळे ऐन आषाढीला भुवैकुंठ सुने सुने वाटले याची हळहळ भाविकांच्या मनात असली तरीही आधुनिक काळाच्या या आव्हानाला सामोरे जाताना कोणी न्यायालयात जाऊन त्यासाठी परवानगी मागितली नाही हेही वैशिष्टय़च मानले पाहिजे. त्यासाठी वारकरी संप्रदायाला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. कोरोना संकटाच्या प्रारंभीच्या काळात ईद हा सण आला होता आणि सामुदायिक नमाज पठण हा देखील असाच भावनेचा मुद्दा होता. मात्र मुस्लिम धर्मियांनी असेच सामंजस्य दाखवत सामुदायिक नमाज पठण न करता आपापल्या घरी राहून प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही चैत्यभूमीवर लाखेंचा भीमसागर लोटतो. यावर्षी आंबेडकरी समुदायाने जे सामंजस्य दाखवले त्याचेही विशेष कौतुक आहे. या तीन मोठय़ा निर्णयांची पूर्वपीठिका असल्याने लालबागच्या राजाचा निर्णय हा सहजा सहजी होऊ शकला हे मान्य केलेच पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी गणेशोत्सव हा तारेवरची कसरत ठरणारा विषय होता. एक तर त्यांनी यापूर्वीच एक भावनिक आवाहन करताना गणेशोत्सवात चार फुटांपेक्षा अधिक उंचीची मूर्ती बसवू नये. दोनपेक्षा जास्त कार्यकर्ते मूर्ती उचलण्यासाठी लागू नयेत असा निर्णय घेऊन भाविकांबरोबरच कार्यकर्त्यांच्या जीविताचीही काळजी घेण्याचे आवाहन केले होते. शिवसेना सत्तेत असताना त्यांना हे आवाहन करायचे होते आणि त्याला प्रतिसाद कसा लाभेल त्याचे काय राजकीय पडसाद उमटतील हे सांगता येत नव्हते. मात्र लालबागच्या राजाने जो निर्णय घेतला त्यामुळे मुंबई प्रमाणेच पुणे येथेही त्याचा प्रभाव जाणवणार आहे. अर्थात संकटाच्या काळात राजकारण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. गणेशोत्सव मंडळांच्यावर, त्याच्या पदाधिकाऱयांवर, त्यासाठीच्या वर्गणीवर, मंडळांच्या गणपतींना मिळणारे दान, देणगीबाबत अनेक आक्षेप घेणारे महाभाग समाजात आहेत. अर्थात ते झालेच पाहिजे. अशाप्रकारे मिळणाऱया दान, देणग्यांचा हिशेब लागला पाहिजे. तो पैसा सार्वजनिक हितासाठी उपयोगतही आला पाहिजे. हीच मंडळी गावोगावच्या देवळांना, मोठय़ा देवस्थानांना, चर्चला, मशिदींना दान दिलेल्या जमिनींची उद्योगपतींपासून राजकारण्यांपर्यंतच्या मंडळींनी धडाक्यात चालवलेली खरेदी-विक्री आणि अशा प्रार्थनास्थळांच्या जागांवर उद्योगपतींनी उभारलेल्या इमल्यांकडे मात्र दुर्लक्ष करतात. आजपर्यंत ज्या लालबागच्या मंडळावर टीकेचे आसूड ओढले जात होते त्याच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचेही खुल्या मनाने स्वागत झाले पाहिजे. चुकले त्यावेळी समाजातून टीका झाली पण, योग्य वागलो त्यावेळी समाजाने डोक्यावरही घेतले अशी या कार्यकर्त्यांची भावना निर्माण झाली पाहिजे. गणेशोत्सवाच्या या विधायकतेला प्रोत्साहन दिले तर अनेक बाबतीत बदल घडेल इतकी लोकशक्ती या उत्सवात आजही आहे. ज्यांच्यावर टीका होते त्या कार्यकर्त्यांचीही एक वैचारिकता आहे आणि त्या वैचारिकतेचा सन्मान हा झालाच पाहिजे. इतके जरी झाले तरी इतर मंडळे अधिक विधायक बनतील. टीकेपेक्षाही कौतुकाने बऱयाचदा हुरूप वाढून चांगले घडते याच्यावर विश्वास वाढणारी घटना मुंबईत घडली आहे. त्याचे स्वागत करुया!
Previous Articleटीआरपीसाठी काहीही
Next Article नागासोबतचा जीवघेणा स्टंट पडला महागात
Related Posts
Add A Comment