ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. त्यामुळे अनेक गणेश मंडळाने मोठ्या गणेशमूर्ती न आणण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबाग राजा गणेश मंडळाने देखील एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदा लालबागचा गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून यंदा लालबाग राजा मंडळ आरोग्योत्सव साजरा करणार आहे.
सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. तसेच गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी लालबागच्या राजाला होणारी गर्दी लक्षात घेता मंडळाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे.

यंदा हे मंडळ 11 दिवस गणपती बाप्पाची मुर्ती न बसवता 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा दान उपक्रम राबवणार आहे. यासाठी मंडळाकडून कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
देशासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाला 86 वर्षांची पंरपरा आहे. गेली 86 वर्ष लालबाग मार्केटमध्ये लालबागचा राजा विराजमान होतो. 14 फुटी उंच आणि मनमोहक अशी बाप्पांची मुर्ती असते. नवसाला पावणारा म्हणून अनेक गणेशभक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता यंदा गणेश मंडळाने गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.