रघुवंश प्रसाद सिंग यांनी पद सोडले
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधानसभा निवडणूक नजीक आल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रीय जनता दलाला मंगळवारी दोन मोठे धक्के बसले आहेत. विधान परिषदेच्या 5 आमदारांनी पक्ष सोडल्यावर राजदचे उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंग यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आहे. परंतु पक्षाकडून अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही.
वैशालीचे माजी खासदार रामा सिंग यांना राजदमध्ये प्रवेश मिळणार असल्याने रघुवंश प्रसाद नाराज झाले आहेत. रामा सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांची भेट घेतली होती. रामा सिंग 29 जून रोजी राजदमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
रघुवंश हे वैशाली मतदारसंघातून 4 वेळा विजयी होऊन लोकसभेत पोहोचले आहेत. 2014 मध्ये रघुवंश यांनी राजद तर रामा यांनी लोजपच्या वतीने निवडणूक लढविली होती. दोन्ही नेत्यांदरम्यान राजकीय हाडवैर आहे. 2019 मध्ये रामा यांना राजदने प्रवेश देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु रघुवंश यांच्या विरोधासमोर पक्षाला झुकावे लागले होते.
राजदचे दिग्गज नेते
रघुवंश हे राजदमधील दिग्गज उच्चवर्णीय नेते आहेत. उच्चवर्णीय मते मिळवून देणारा नेता म्हणून त्यांना ओळखले जाते. वैशाली मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यांचे ते घनिष्ठ सहकारी मानले जातात. राजदने उच्चवर्णीयांच्या आर्थिक निकषावरील आरक्षणाला विरोध केला असताही रघुवंश यांनी पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.