प्रतिनिधी / कुडाळ :
पुणे-सातारा महामार्गावर आनेवाडी टोल नाक्याजवळ लिंब खिंड येथे ट्रकला विचित्र अपघात झाला. सातारच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटून तो पुढच्या ट्रकवर आदळल्याने ट्रक जागेवर पलटी झाला. यामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघाताची अधिक माहिती अशी, आनेवाडी टोल नाक्याजवळ लिंब खंडित मुंबईवरून कोल्हापूरच्या दिशेला जाणाऱ्या कारने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकने पुढच्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात लोखंडी सळी घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर पलटी झाला. यामध्ये चालक केबिनमध्येच लोखंडाखाली दबला गेला होता. बाहेर येण्यासाठी ट्रक चालक प्रयत्न करत होता. मात्र वीस ते तीस टनाचे वजनाचे लोखंड त्याच्या कमरेखालील भागावर आदळल्याने तो पूर्णतः त्या लोखंडाच्या खाली दबला गेला होता. तो मदतीची याचना करत होता. मात्र घटनास्थळावर नागरिक उपस्थित असून, देखील त्याला बाहेर काढता येत नसल्याने पूर्णतः लोखंड बाहेर काढल्यानंतर त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले. ट्रकचालकाचे दोन्ही पाय गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद भुईंज पोलीस स्थानकात झाली आहे.