लंडन / वृत्तसंस्था
ब्रिटनमध्ये दरवर्षी नव्या वर्षाच्या प्रारंभी विविध क्षेत्रात देदीप्यमान योगदान देणाऱया व्यक्तिमत्त्वांचा खास सन्मान केला जातो. त्यात यंदा एफ वन ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनचा झाला आहे. हॅमिल्टनने मायकल शुमाकरच्या 7 फॉर्म्युला वन जगज्जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. त्या पराक्रमाची येथे प्राधान्याने दखल घेतली गेली आहे.
35 वर्षीय हॅमिल्टनने 2020 मध्ये शुभाकरच्या विक्रमाशी बरोबरी साधली. मात्र, नंतर कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटाचा एफ वनला देखील फटका बसला आणि काही शर्यती गुंडाळाव्या लागल्या. ब्रिटनमधील प्रशासकांनी मागील महिन्यात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भेट घेतली आणि हॅमिल्टनची नाईटहूड सन्मानासाठी शिफारस केली. उद्योग, राजकारण व क्रीडा अशा विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा देखील यात समावेश होता.
मोनॅको येथे राहणाऱया हॅमिल्टनला मागील सहा महिन्यांच्या कालावधीत करचुकवेगिरीप्रकरणी प्रदीर्घ चौकशीला सामोरे जावे लागले आहे. पण, ब्रिटनमध्ये आपण पूर्ण कर अदा करतो, असे त्याने स्पष्ट केले आहे. लोकशाही, वंशवाद अशा अनेक बाबतीत, तसेच मानवी हक्क, समानता, विविधता व पर्यावरण याबाबतीत हॅमिल्टनने काही वेळा आपली भूमिका मांडली आणि जनमानसातून त्याचे स्वागतही झाले होते.
लीडस ऱिहनोज रग्बी खेळाडू रॉब बुरोला ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर म्हणूनही यावेळी मान्यता मिळाली. 38 वर्षीय बुरोला गतवर्षी डिसेंबरमध्ये मोटर न्युरोन आजाराने त्रस्त केले होते. त्याला क्रीडा क्षेत्रातील योगदान, त्याचप्रमाणे न्युरोन आजाराबाबत जागरुकता निर्माण केल्याबद्दल गौरवण्यात आले.
याशिवाय, माजी फुटबॉलपटू जिम्मी ग्रीव्हस व रॉन फ्लॉवर्स यांचाही पुरस्कारजेत्यांमध्ये समावेश आहे. इंग्लंडच्या 1966 फुटबॉल विश्वचषक जेत्या संघातील हे दोनच खेळाडू सध्या हयात आहेत. या उभयतांनाही ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर किताबाने गौरवले गेले आहे.
1981 मध्ये ऍल्डानिटी येथे ग्रँड नॅशनल स्पर्धा जिंकणाऱया व कर्करोगातून सावरणाऱया बॉब चॅम्पियनना ऑर्डर ऑफ ब्रिटीश अम्पायर कमांडर पदवीने सन्मानित केले गेले असून बॉब चॅम्पियन कॅन्सर ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची त्यात दखल घेतली गेली. रग्बी खेळाडू रॉब बॅक्स्टर व संघाचा कर्णधार जो सायमंड्स यांचाही यात आवर्जून सन्मान केला गेला आहे.