महिला काँग्रेसची मागणी
प्रतिनिधी /वास्को
गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने बुधवारी वेर्णा व वास्को येथे पोलीस अधिकाऱयांची भेट घेऊन पोलीस उपनिरीक्षक नारायण पिंगे याच्यावर लैंगिक अत्याचार व फसवणुक प्रकरणी गुन्हा नोंद झालेला असतानाही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून त्यांच्या अटकेची व निलंबनाची मागणी केली. या महिला शिष्टमंडळासोबत काँग्रेसचे युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, सरचिटणीस जनार्दन भंडारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मुरगाव पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक नारायण पिंगे याच्या विरूध्द आठ दिवसांपूर्वी एका तरूणींने लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीची वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उपनिरीक्षक पिंगे याच्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना मुरगाव पोलीस स्थानकातून इतर ठिकाणी बदलीवर पाठवण्यात आले. मात्र, त्याच्याविरूध्द अटक आणि निलंबनाची कारवाई अद्याप झालेली नसल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱयांनी नाराजी व्यक्त केली. लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेल्या अधिकाऱयांना अटक करा व त्याला सेवेतून निलंबीत करा अशी मागणी घेऊन काँग्रेसचे शिष्टमंडळ वेर्णा व वास्को येथे आले होते. वेर्णातील पोलीस निरीक्षक शेरीफ जाकीस यांची भेट घेऊन त्यांनी वास्कोत पोलीस उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांचीही भेट घेतली. सदर उपनिरीक्षकाचे प्रकरण उपअधीक्षक राऊत देसाई हाताळीत आहेत. शिष्टमंडळाने त्यांच्याकडे पोलीस उपनिरीक्षकाविरूध्द कारवाई झालेली नसल्याबद्दल जाब विचारून त्या अधिकाऱयाला अटक व निलंबीत करावे अशी मागणी केली. कोणताही अधिकारी कायद्यापेक्षा वरचढ नाही, गुन्हा केलेल्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी. या प्रकरणी आम्ही पोलीस महानिरीक्षकांचीही भेट घेणार असल्याची माहिती बीना नाईक यांनी दिली.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी अन्य कोणी शासकीय सेवा किंवा सामान्य माणूस अशा गुन्हय़ात सापडला असता तर त्याला गजाआड करण्यात आले असते. पोलीस उपनिरीक्षक पिंगे याच्यामागे राजकीय वरदहस्त असून राजकीय पाठींब्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा दावा केला. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी काँग्रेस पक्ष या मुद्धय़ावर शेवटपर्यंत लढा देईल असे सांगितले व पोलिसांच्या भुमीकेवर टीका केली.