हॉकर्स झोनचे घोंगडे भिजतच, वाहतूक व पादचाऱयांना अडथळा
वार्ताहर/ कराड
आठ महिन्याच्या लॉकडाऊननंतर हातगाडा व टपरीधारकांनी पुन्हा फुटपाथवर व्यवसाय सुरू केल्याने पादचारी रस्त्यावर आले आहेत. तर फुटपाथच्या खाली रस्त्यावरही गाडे लागत असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. नगरपालिकेच्या वतीने निश्चित करण्यात आलेल्या हॉकर्स झोनचे घोंगडे भिजत पडले असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कोरोना संकट येण्यापूर्वी फेबुवारी महिन्यात कराड नगरपालिकेने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. यावेळी कराड शहरातील सर्व हातगाडे काढण्यात आले होते. तर मार्चपासून लॉकडाऊन झाल्याने आठ ते नऊ महिने शहरातील सर्वच रस्त्यावरील व फुटपाथवरील हातगाडे व टपऱया बंद होत्या. मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर हातगाडे धारकांनी व्यवसाय सुरू केले आहेत.
दत्त चौक ते कृष्णा नाका दरम्यानच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फुटपाथवर मोठय़ा प्रमाणात हातगाडे व टपऱया लावण्यात आल्या आहेत. बसस्थानक परिसरात तर व्यावसायिकांनी संपूर्ण फुटपाथच आपल्या ताब्यात घेतला आहे. फुटपाथवर टेबल खुर्च्या मांडून हॉटेल सुरू केली आहेत. तर फुटपाथच्या खालीही हातगाडे लागत असल्याने पादचाऱयांना रस्त्याच्या मधून चालावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला असलेले हातगाडे, रिक्षा, वडापची वाहने व पार्किंग यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.
वास्तविक अतिक्रम हटाव मोहिमेनंतर पालिकेने शहरात चार ठिकाणी हॉकर्स झोन निश्चित केले होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळयाच्या पाठीमागील मैदान, नवग्रह मंदिरासमोरील रस्ता, टाऊन हॉल परीसर व थाटबाट समोरील जागेत हॉकर्स झोन करण्यात आले होते. चिठ्ठय़ा काढून व्यावसायिकांच्या जागा निश्चित केल्या होत्या. तर या जागेत व्यावसायिकांसाठी जागांची आखणी देखील केली होती. मात्र मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्याने हॉकर्स झोनचा प्रश्न जैसे थे आहे. लॉकडाऊननंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने सर्व व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यामुळे पालिकेने आतातरी हॉकर्स झोनचा प्रश्न सोडवण्याची मागणी होत आहे.
पर्याय नसल्याने हातगाडा धारक रस्त्यावर
नगरपालिकेने हॉकर्स झोन निश्चित केले आहेत. पण अद्याप जागा ताब्यात दिली नाही. त्यामुळे हातगाडा धारक रस्त्यावरच आहेत. हॉकर्स झोनच्या जागेवर असलेल्या अडचणी दूर करून पालिकेने जागा हातगाडा धारकांच्या ताब्यात द्यावी.