पॉवर टिलरला जोडण्यास सोपे, वापरण्यास सुलभ, २o मशीनची विक्री,
युवराज भित्तम/म्हासुर्ली
म्हासुर्ली पैकी कुंभारवाडी (ता.राधानगरी) येथील वेल्डिंग व्यावसायिक कारागिर राजू भाऊ सुतार यांनी लॉकडाऊन काळात धान्य पिकांची मळणी सुलभ करण्यास व पॉवर टिलर टॅक्टरला जोडून कुठे ही पिकांची मळणी करण्यास उपयुक्त ठरत असलेल्या मळणी मशीनची निर्मिती केली आहे. सदर मळणी मशीनला शेतकरी वर्गातून मागणी वाढली असून आता पर्यत २० मशीनची विक्री झाली आहे.
गरज ही शोधाची जननी असते या उक्तीप्रमाणे कोरोना व्हायरसमुळे जाहिर केलेल्या लॉकडाऊन काळातील वेळ फुकट न घालविता मिळालेल्या संधीचा व वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न राजू सुतार या तरुणांने केला आहे. सुतार यांनी शेतातील भात, नाचणा, शाळू या पिकांची मळणी करण्यासाठी व धान्याची नासाडी होऊ नये या दृष्टीने, तसेच शेतकऱ्यांना पॉवर टिलरच्या साहाय्याने वापरण्यास सुलभ ठरणारे मळणी मशीन तयार करण्याचा संकल्प करून तो पूर्ण केला आहे.
पॉवर टिलर व्यावसायिक शेतकऱ्यांना कमी किमंतीतील तसेच डोंगर उतारावरील शेतात सहजपणे नेण्या आणण्यास उपयुक्त ठरणारे मळणी यंत्र तयार करण्याची इच्छा राजू सुतार यांची होती.पण दैनदिन कामामुळे ते मागे पडत गेले होते. मात्र लॉकडाऊन काळात त्यांनी पूर्णवेळ काम करत सर्वांना उपयुक्त असे मळणी यंत्रे बनवली आहेत. परिणामी सदर मळणी यंत्रामुळे शेतकऱ्यांचे श्रम व वेळ वाचला असून ग्रामीण भागातील शेतकरी वर्गांचे भात मळणीचे काम सुलभ झाले आहे.
ग्रामीण भागातील विशेषता डोंगर भागातील शेत जमिनीमध्ये शेतकऱ्यांना सहजपणे वापरण्यास उपयोगी ठरणाऱ्या या मशिनमुळे शेतकऱ्यांची पिकाची झोडपणी मळणी करण्यापासून सुटका झाली आहे. तशाच प्रकारे जनावरांचा पण मळणीसाठी होणारा वापर थांबणार असल्याचे राजू सुतार यांनी सांगितले.
सदर मळणी मशीन सुरक्षितेच्या दृष्टीने व वापरण्यास सुलभ असल्याने तसेच किमंतीत परवडत असल्याने पॉवर टिलर ट्रॅक्टर व्यावसायिकांच्याकडून या मशीनाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. आता पर्यत सुतार यांनी सुमारे २० मशीनची विक्री केली असून पंधरा हजार इतक्या अल्प किमंतीत विक्री केली आहे.
शेतकऱ्यांना उपयुक्त मशीन
राजू सुतार यांनी बनविलेले मळणी मशीन पॉवर टिलर व्यावसायिक शेतकऱ्यांना उपयुक्त असेच ठरत असून धान्याची मळणी चांगल्या प्रकारे होत आहे. तसेच अरूंद ठिकाणी, डोंगर येथे ही मशीने नेण्यास चांगले असून सुरक्षितेच्या दृष्टीने ही फायद्याचे आहे. – संतोष चव्हाण, पॉवर टिलर शेतकरी
Related Posts
Add A Comment