प्रतिनिधी / कोल्हापूर
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे नियमावली करुन लॉकडाऊनसंदर्भात निर्णय जाहीर करतील. त्यासाठी उद्योजकांनी शासनास सहकार्य करावे, असे आवाहन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे केले. तर जिल्हा प्रशासनातर्फे औद्योगिक कामगारांची`आरटीपीसीआर’ऐवजी अँटीजेन चाचणी जागेवर जाऊन केली जाईल, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी कामगार मंत्री हसन मुश्रीफ होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन, संचालक हर्षद दलाल, सचिव प्रदीप व्हरांबळे, नॅक'चे अध्यक्ष गोरख माळी,
स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, जिल्हा प्रशासनातर्फे कामगारांची `आरटीपीसीआर’ चाचणी ऐवजी ऍन्टीजेन्ट चाचणी कारखान्याच्या ठिकाणी जावून केली जाईल. तसेच शासनाकडून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास फक्त औद्योगिक क्षेत्रच नव्हे तर संपूर्ण जिल्हाचे लसीकरण लवकरात लवकर पुर्ण केले जाईल. या चाचणीला 10 एप्रिल ऐवजी 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ते पुढे म्हणाले, कोरोनाची लक्षणे नसलेले पॉझिटीव्ह रुग्ण शोधून कोरोनाचा फैलाव रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे. संपूर्ण लॉकडाउन जाहीर झाले तरी उद्योगांना यातून वगळावे. जर उद्योग बंद राहीले तर फार मोठा आर्थिक फटका उद्योग तसेच राज्यालाही सहन करावा लागेल. त्यामुळे ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव जास्त आहे तीच नियमावली कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या जिल्हयाना लावू नये. अशी विनंती सर्व उद्योजकांच्यावतीने करण्यात आली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, उद्योजकांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू. ऍन्टीजेन्ट चाचणी व लसीकरण करण्यासाठी प्रत्येक `एमआयडीसी’ आणि शहरातील औद्योगिक वसाहतीसाठी एक संर्पक अधिकारी नेमला जाणार असून लवकरच त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी काढतील.