ऑनलाईन टिम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉक डाऊनची घोषणा केली आहे. या लॉक डाऊन मध्ये सर्वचजण घरात आहेत. तर अनेकजण घरात बसून काम करत आहेत. या लॉक डाऊन दरम्यान, पंतप्रधान मोदी घरात काय करतात ? असा प्रश्र्न सर्वांनाच पडला आहे. रविवारी मोदींनी मन की बात मधून देशवासीयांशी संवाद साधला. त्यावेळी एकाने तुमचं फिटनेस रुटीन काय? असा प्रश्र्न विचारला होता.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जनतेला लॉक डाऊनच्या काळात प्रकृतीची काळजी कशी घ्याल? याबाबत माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपला योगासन करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
यामध्ये ते म्हणतात की, मी कोणताही फिटनेस किंवा वैद्यकीय तज्ञ नाही. दररोज योगासनांचा सराव करणं हा माझ्या आयुष्यातील अंतर्गत विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी योगासने करत असून याचा मला फायदा झाला आहे. मला खात्री आहे की, तुमच्या कडेही फिट राहण्यासाठी इतर पर्यायही उपलब्ध असतील. हे पर्याय तुम्ही देखील इतरांसोबत शेअर करायला हवेत. असे मोदींनी म्हटले आहे.
सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात लोकांचा दिनक्रम आरोग्यपूर्ण रहावा यासाठी तुम्ही देखील लोकांना प्रोत्साहित करा. असं आवाहन देखील मोदींने जनतेला केले. पुढे ते म्हणाले आपला योगासनं करतानाचा व्हिडिओ विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. ते व्हिडिओ तुम्ही देखील पाहू शकता असा सल्ला देत योगासन करण्याच्या सरावासाठी त्यांनी जनतेला शुभेच्छाही दिल्या.