मनीषा सुभेदार/ बेळगाव
लॉकडाऊन ही सुटी नव्हे, हे प्रथम लक्षात घेऊया. त्याचबरोबर ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना राबविताना घरातच कार्यालयात असल्याप्रमाणेच वेळ पाळतो आहोत. ऑफिसला जाताना जसे तयार होतो तसे तयार होऊन आपण घरातही काम करण्यासाठी बसलो तर आपल्याला ऑफिसचा एक ‘फिल’ येईल आणि आपण कोरोनाच्या विचारापासून दूर राहू शकतो हा अनुभव सध्या आम्ही घेत आहोत. ही लढाई आपण सर्वजण एकत्रच लढणार आहोत आणि विजयीसुद्धा होणार आहोत. कारण दिवस बदलतील यावर आमचा विश्वास आहे….
अमेरिकेमधून अमिता आणि प्रतीक टेंबे बोलत होते. सध्या हे दोघेही अमेरिकेमध्ये आहेत. तेथील परिस्थिती ते अनुभवत आहेत. त्यातील दाहकता त्यांना जाणवली आहे. त्यामुळेच भारतीयांनी सरकारने दिलेले सर्व नियम पाळणे अत्यावश्यक आहे, असे त्यांना वाटते. प्रतीक हा कीर्ती आणि सुबोध टेंबे यांचा मुलगा तर अमिता ही जयश्री आणि संजीव नाईक यांची मुलगी होय.
सर्वांनी लॉकडाऊनचे नियम गांभीर्याने घ्या
प्रतीक म्हणतो, सध्या अमेरिकेत 500,000 जण बाधित झाले आहेत. भारतात ही संख्या 9 हजार असून 300 मृत्यू झाल्याचे आम्ही हे अनुभव कथन करताना आम्हाला समजलं. अमेरिकेच्या तुलनेत भारतातील परिस्थिती फार बरी असे वाटते. सरकार कोरोनाच्या नियंत्रणार्थ जे जे पाऊल उचलते आहे. ते खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी तसा लहान असलो तरी तुम्हा सर्वांना विनंती करतो की कृपया सर्वजणांनी लॉकडाऊनचे नियम गांभीर्याने घ्या.
आपण परस्परांपासून दूर राहणे, सामाजिक अंतर पाळणे, नक्कीच करू शकतो. हा नियम विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी आहे. चीन, इंग्लंड, स्पेन, इटली यांच्या तुलनेत भारतातील कोरोना लागण झाल्याची आकडेवारी कमी आहे. जितके आपण लॉकडाऊन होऊन घरात राहू तितक्मया लवकर आपल्याला नेहमीच्या दैनंदिन जीवनाच्या पूर्वपदावर येता येईल, असे अमिता म्हणते.
पालकांनी आमची चिंता करू नये
आम्ही आणि आमचे मित्र मैत्रिणी भारतातील आमच्या पालकांशी सतत बोलत आहोत. ते आमच्या काळजीत असणे साहजिक आहे. परंतु माझ्या वैयक्तिक अनुभवावरून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही सरकारने दिलेले सर्व नियम पाळत आहोत. फक्त अन्नधान्य किंवा औषधे या व्यतिरिक्त बाहेर पडत नाही. आम्ही फोनवरून परस्परांच्या संपर्कात राहतो. आमच्यापैकी कोणाही एकटय़ाला निराश किंवा उदास वाटू लागले की, आम्ही त्वरित त्याच्याशी विविध विषयांवर बोलत राहतो. आणि त्याला पुन्हा उभारी देतो. त्यामुळे पालकांनी आमची बिलकूल चिंता करू नये, उलट त्यांनी खूप काळजी घ्यावी, असे त्यांना वाटते.
आम्हा दोघांसाठी हाती आलेला हा वेळ कार्यालयीन काम करूनच अन्य छंदासाठी देता येत आहे. आमचे आर्थिक अंदाजपत्रक यापुढे कसे असणार आहे. याचा आम्ही खूप विचार केला. पुढील काळ लक्षात घेता त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्या जीवनशैलीत कसे बदल करून घ्यावेत, याचाही आम्ही विचार करतो आहोत. त्याचवेळी आपल्याला काही पर्याय निवडून आर्थिक स्रोत वाढविता येणे शक्मय आहे का, याचाही विचार आम्ही करत आहोत, असेही अमिता आणि प्रतीक यांनी सांगितले.
वॉरेन बफेट्स म्हणतो, ‘जेव्हा सर्वजण अधाशी (ग्रीडी) असतात. तेव्हा तुम्हाला भीती (स्केअर्ड) वाटते आणि जेव्हा सर्वजण घाबरतात तेव्हा तुम्ही अधाशी रहा. या सूत्राला अनुसरून स्टॉक मार्केट हे क्षेत्र ज्यांना नवीन आहे त्यांनी या काळात ट्रेडिंगच्या क्लुप्त्या समजून घ्याव्या आणि जे ट्रेडिंगमध्ये आहेत त्यांनी गुंतवणुकीबाबत निवांतपणे विचार करावा, असेही प्रतीक सुचवितो.
तुमचे छंदही जोपासा
सध्या ऑनलाईन प्रमाणपत्राचे अनेक अभ्यासक्रम आहेत. त्याचा तुम्ही जरुर विचार करावा, असे आम्ही सुचवू शकतो. केवळ अभ्यास, कार्यालयीन काम किंवा वैचारिक लेखन करा, असे मी म्हणत नाही. तर तुमचे छंदही जोपासा आम्ही सध्या मेणबत्त्या करतो आहोत. ब्लॉग लिहितो आहोत आणि आमचा वेळ उत्तम घालवित आहोत.
हे संकट जसे आले तसे जाणार
कोरोनाचे संकट जसे आले तसे ते जाणार आहे. आमच्या बरोबरीचे जे मित्र आहेत. त्यांना आम्ही सांगतो की, कार्यालयीन पोषाख करूनच कामाला लागा. त्यामुळे वैयक्तिक आणि कार्यालयीन कामकाज यामध्ये अंतर राहील. काम करत असताना सातत्याने काही मिनिटांसाठी ब्रेक घ्या आणि या लढाईत आपण सगळे एकत्रच आहोत आणि ही लढाई जिंकणार आहोत याची खात्री बाळगा.