इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी : पहिल्या दिवसअखेर भारत 3 बाद 276, रोहित-राहुलची 126 धावांची भागीदारी, 2011 नंतर आशियाबाहेर शतकी सलामी देण्यात प्रथमच यश

वृत्तसंस्था /लंडन
अभिजात गुणवत्ता लाभलेला केएल राहुल (127) लॉर्ड्स मैदानावर शतक झळकावणारा दहावा भारतीय फलंदाज ठरल्यानंतर भारताने येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर 3 बाद 276 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर रोहित शर्माची (145 चेंडूत 83) लॉर्ड्सवर शतक झळकावण्याची नामी संधी वाया गेली असली तरी त्याची झुंजार खेळी भारताला सन्मानजनक स्थितीत पोहोचण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यात निर्णायक ठरली.
रोहितने 185 मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडत 145 चेंडूत 83 धावांची बहारदार खेळी साकारली. त्याच्या या लक्षवेधी डावात 11 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. अँडरसनने त्रिफळा उडवत रोहितची खेळी संपुष्टात आणली.
एकीकडे, रोहित आक्रमण करत असताना बचावात्मक पवित्र्यावर अधिक भर देत आलेल्या केएल राहुलने रोहित बाद झाल्यानंतर आक्रमणाची धुरा स्वीकारली आणि दिवसअखेर तो 127 धावांवर नाबाद राहिला. लॉर्ड्सवर शतक झळकावणारा तो विनू मंकड, वेंगसरकर, गुंडाप्पा विश्वनाथ, अझहर, शास्त्री, गांगुली, आगरकर, द्रविड, रहाणे यांच्यानंतर 10 वा भारतीय ठरला.
कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा (23 चेंडूत 9) आणखी एकदा अपयशी ठरला. त्याने अँडरसनच्या बाहेर जाणाऱया चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात स्लीपमध्ये बेअरस्टोकडे सोपा झेल दिला.
कर्णधार विराट कोहलीने 42 धावांची तडफदार खेळी साकारली. मात्र, जम बसला आहे, असे वाटत असताना अचानक तो स्लीपमध्ये झेल देत तंबूत परतला.
तत्पूर्वी, पावसाने व्यत्यय आलेल्या पहिल्या सत्रात भारताने 18.4 षटकात बिनबाद 46 धावांपर्यंत मजल मारली होती. लॉर्ड्सवरील या कसोटी सामन्यात केएल राहुल व रोहित शर्मा यांनी इंग्लिश माऱयाचा उत्तम सामना केला. गोलंदाजीला अनुकूल अशा टेस्ट मॅच कंडिशन्समध्ये जलद गोलंदाजांना सामोरे जाणे काही वर्षांपूर्वी अगदी रोहित शर्मासाठी देखील आव्हानात्मक होते. मात्र, येथे रोहितने ही जबाबदारी अतिशय लीलया सांभाळली.
इंग्लिश गोलंदाजांनी येथे पहिल्या तासाभराच्या खेळात सातत्यपूर्ण मारा केला. पण, प्रभावशाली तंत्रामुळे केएल राहुल व रोहित शर्मा अधिक सरस ठरले. या उभयतांनी अनुभवी जेम्स अँडरसन व ताज्या दमाच्या ऑलि रॉबिन्सनचा सहज सामना केला. ‘चौथ्या ऑफ स्टम्प’च्या रोखाने टाकले जाणारे चेंडू सोडून देण्याची रणनीती राहुल-रोहितसाठी उपयुक्त ठरली. पहिल्या 10 षटकात केवळ 11 धावा जमवल्या असल्या तरी फलंदाज-गोलंदाजांमधील जुगलबंदी यात सातत्याने रंगत गेली होती.
सॅम करणच्या डावातील 13 व्या षटकात भारताने पहिला चौकार नोंदवला. रोहितने पॅडवरील चेंडू स्क्वेअरच्या मागे फ्लिक करत 4 धावा वसूल केल्या. पहिल्या तासाभरात उत्तम बचाव केल्यानंतर रोहितने फटक्यांचा ओघ वाढेल, यावर भर दिला आणि यानंतरच धावसरासरी खऱया अर्थाने वाढत गेली. रोहित व केएल राहुल या जोडीने 32.5 षटकात 100 धावांची भागीदारी फलकावर लावली. यावेळी रोहित 109 चेंडूत 75 तर केएल राहुल 87 चेंडूत 16 धावांवर खेळत होते. रोहितचा थर्डमॅनच्या दिशेने फटकावलेला षटकार विशेष लक्षवेधी ठरला. केएल राहुलचे अर्धशतक या डावातील आणखी एक वैशिष्टय़ ठरले. यापूर्वी, नॉटिंगहॅम येथील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने 84 धावांची दमदार खेळी साकारली होती. उभय संघातील या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत पावसामुळे भारताची विजयाची संधी हिरावली गेली व ती लढत अनिर्णीत राहिली होती.
धावफलक
भारत पहिला डाव : रोहित शर्मा त्रि. गो. अँडरसन 83 (145 चेंडूत 11 चौकार, 1 षटकार), केएल राहुल खेळत आहे 127 (248 चेंडूत 12 चौकार, 1 षटकार), चेतेश्वर पुजारा झे. बेअरस्टो, गो. अँडरसन 9 (23 चेंडूत 1 चौकार), विराट कोहली झे. रुट, गो. रॉबिन्सन 42 (103 चेंडूत 3 चौकार), अजिंक्य रहाणे खेळत आहे 1 (22 चेंडू). अवांतर 14. एकूण 90 षटकात 3 बाद 276.
गडी बाद होण्याचा क्रम
1-126 (रोहित, 43.4), 2-150 (पुजारा, 49.6), 3-267 (विराट, 84.4)
गोलंदाजी
अँडरसन 20-4-52-2, रॉबिन्सन 23-7-47-1, सॅम करण 18-1-58-0, मार्क वूड 16-1-66-0, मोईन अली 13-1-40-0.
इंग्लिश संघात 3 बदल, भारताची इशांत शर्माला पसंती
यजमान इंग्लंडने या दुसऱया कसोटी सामन्यात 3 बदल करताना डॅन लॉरेन्स, झॅक क्राऊली व स्टुअर्ट ब्रॉड यांच्या जागी मोईन अली, हमीद व मार्क वूड यांना संधी दिली. भारताने एकमेव बदल करताना दुखापतग्रस्त शार्दुल ठाकुरऐवजी इशांत शर्माला 11 सदस्यीय संघात स्थान दिले. खेळपट्टीचे स्वरुप पाहता 4 जलद गोलंदाज खेळवणे योग्य होते. त्यामुळे, अश्विनला खेळवले नसल्याचे विराट म्हणाला.
लॉर्ड्सवर शतक झळकावणारे भारतीय फलंदाज
फलंदाज धावा वर्ष
- विनू मंकड 184 1952
- दिलीप वेंगसरकर 103 1979
- गुंडाप्पा विश्वनाथ 113 1979
- दिलीप वेंगसरकर 157 1982
- दिलीप वेंगसरकर 126* 1986
- मोहम्मद अझरुद्दीन 121 1990
- रवी शास्त्री 100 1990
- सौरभ गांगुली 131 1996
- अजित आगरकर 109* 2002
- राहुल द्रविड 103* 2011
- अजिंक्य रहाणे 103 2014
- केएल राहुल 127* 2021
कसोटीत रोहित शर्माची 2018 नंतर विदेशातील कामगिरी
ठिकाण प्रतिस्पर्धी वर्ष पहिला डाव दुसरा डाव
- लॉर्ड्स इंग्लंड 2021 83
- नॉटिंगहम इंग्लंड 2021 36 12*
- साऊथम्प्टन न्यूझीलंड 2021 34 30
- ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया 2021 44 7
- सिडनी ऑस्ट्रेलिया 2021 26 52
- मेलबर्न ऑस्ट्रेलिया 2018 63* 5
- ऍडलेड ऑस्ट्रेलिया 2018 37 1
- सेंच्युरियन द. आफ्रिका 2018 10 47
- केपटाऊन द. आफ्रिका 2018 11 10.