ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यातील कोरोना निर्बंध शिथील झाल्यानंतर सर्वसामान्यांची लाईफ लाईन असलेल्या मुंबई लोकल ट्रेन कधी सुरू होणार याची वाट पाहत असलेल्या लाखो मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच लोकल ट्रेन सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या जी पश्चिम कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील कोरोना परस्थिती यशस्वीरित्या हाताळल्याबाबत महापालिकेचा गौरव केला. त्याचवेळी, त्यांनी सध्याचे निर्बंध व लोकलबाबतही भाष्य केले आहे. ते म्हणाले, जिथे निर्बंध शिथील केले जाऊ शकतात, तिथे तसा निर्णय घेतलेला आहे. लोकल सुरू करण्याबाबतही विचार सुरू आहे. जबाबदारीचे भान ठेवूनच लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल,’ असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. या सोबतच ‘निर्बंध शिथील न झालेल्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी नियम तोडू नयेत. संयम सोडू नये,’ असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.
कोरोनाच्या संकट काळात मुंबई महापालिकेनं केलेल्या कामाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तोंडभरून कौतुक केले. कोरोना काळात मुंबई मॉडेलचे सर्वत्र कौतुक झाले. पालिका कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्यामुळेच हे शक्य झाले. कोरोनाला रोखण्याचे काम महापालिकेने केला. धारावीसारख्या झोपडपट्टीत कोरोनाला हरवले, संकटाचा मुकाबला करतानाच नागरिकांच्या सेवेतही खंड पडू दिला नाही. संकटाचा सामना करतानाच मुंबईत विकास कामेही सुरू आहेत,’ असेही ते म्हणाले.
- उच्च न्यायालयाचे सरकारला सवाल!
दरम्यान, मुंबईत लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी दिली जावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर देखील सुनावणी सुरू आहे. या सुनावणीवेळी, बस आणि अन्य सार्वजनिक वाहनांतून गर्दीने प्रवास चालू शकतो. मग लोकलमधून का नाही. तिथे संसर्ग होणार नाही का?, असा खडा सवाल न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. तसेच, पत्रकारांना लोकलने प्रवास करण्यास मनाई असल्याचे माहिती पडले, तेव्हा आश्चर्य वाटल्याचे देखील न्यायालयाने नमूद केले आहे. यासंदर्भात पुढील गुरुवारी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.