वृत्तसंस्था / कोची :
केरळमधील कोल्लम येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ऍस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर 22 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान हॉकी इंडियातर्फे दहाव्या वरिष्ठांची राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत देशातील काही अव्वल महिला हॉकीपटू विविध कारणास्तव सहभागी होणार नाहीत. सध्या महिला हॉकीपटूंसाठी हॉकी इंडियातर्फे शिबीर चालू आहे. तसेच रेल्वेने केरळमधील या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
2020 हे वर्ष ऑलिंपिक साल म्हणून गणले जात आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाची जोरदार तयारी सुरू आहे. अव्वल 25 महिला हॉकीपटूंसाठी आगामी न्यूझीलंड दौऱयाकरिता बेंगळूरमधील भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या केंद्रामध्ये (साई), राष्ट्रीय सराव शिबीर सुरू असल्याने केरळमधील स्पर्धेत अनेक महिला हॉकीपटूंना सहभागी होता येणार नाही. भारतीय महिला हॉकी संघ न्यूझीलंडच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात पाच सामने खेळविले जातील. त्यापैकी भारताचा एक सामना ब्रिटनबरोबर होईल. भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिंपिकचे तिकीट यापूर्वीच मिळविले आहे.
हॉकी इंडियाने रेल्वे क्रीडा मंडळावर निलंबनाची कारवाई करून हे मंडळ रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने रेल्वेने कोल्लमच्या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हॉकी इंडियाच्या महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत रेल्वेचा संघ विद्यमान विजेता आहे. कोल्लममधील स्पर्धेत नवनीत कौर, नवजीत कौर, सुशिला छानू, नेहा गोयल, वंदना कटारिया, गुरूजीत कौर, दीप ग्रेस एक्का, रिना खोकार, मनप्रित कौर, निशा, ज्योती, निकी प्रधान, रजविंदर कौर सहभागी होणार नाहीत. कोल्लममधील या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांच्या हस्ते होणार असून 9 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेतील विजेत्यांना केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन यांच्या हस्ते बक्षिसे दिली जातील.