प्रतिनिधी / कोल्हापूर
ताराराणी विद्यापीठातून आतापर्यंत हजारो विद्यार्थीनी शिक्षण घेतले आहे. क्रिडा क्षेत्रासह अन्य क्षेत्रात विद्यार्थीनींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ताराराणी विद्यापीठाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. ताराराणी विद्यापीठ कौशल्याधिष्ठीत शिक्षणासह वसतिगृहाच्या माध्यमातून महिला सुरक्षेला महत्व देत आहे, असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले.
ताराराणी विद्यापीठातील नूतन वसतिगृहाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. याप्रसंगी ते बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाहू महाराज म्हणाले, महाराणी ताराराणी यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी मुघलांना पराभूत केले. त्यांच्या शौर्याची गाता सर्वश्रुत आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी कोल्हापुरात त्यांच्या नावाने ताराराणी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागातील मुलींसाठी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून यापुर्वी एक वसतिगृह होते. परंतू मुलींचे वाढते प्रमाण पाहुण अत्याधुनिक पध्दतीच्या नवीत वसतिगृहाची स्थापना करण्यात आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, डॉ. व्ही. टी. पाटील यांनी ताराराणी विद्यापीठाची स्थापना करून महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ठेवण्या प्रयत्न केला आहे. या शैक्षणिक साम्राज्याचे तुकडे न पडू देता डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी हे साम्राज्य सांभाळले आहे. ताराराणी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, एनसीसी कँप येथे मुलींच्या वसतिगृहाची स्थापना करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची वसतिगृहाची चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न मी केला आहे. देशाची प्रगती होत असताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. परंतू ताराराणी विद्यापीठातील वसतिग़हामुळे मुलींना शिक्षणाबरोबर सुरक्षेची हमीदेखील मिळत आहे.
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, विद्यापीठ, कॉलेज परिसरात मुलींचे वसतिगृह असले की वाडÎावस्त्यांवरील मुलींना शिक्षण घेणे सोयीचे ठरते. ताराराणी विद्यापीठाच्या वसतिगृहामुळे अनेक मुलींना चांगले शिक्षण घेता आले आहे. या नवीन वसतिगृहामुळे आणखी शंभर मुलींना बळ मिळणार आहे. ऑलिम्पिकमध्ये विविध क्रिडा प्रकारात सहभाग घेतलेल्या तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, स्वरूप पुनाळकर यांचा सत्कार करण्यात आला, हा सत्कार त्यांच्या कुटुंबियांनी स्विकारला. प्रास्ताविक ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. सुजय पाटील, सोनल चव्हाण यांनी केले. आभार ताराराणी विद्यापीठाचे सचिव प्राजक्त पाटील यांनी मानले. यावेळी ताराराणी विद्यापीठाचे उपाध्यक्ष अशोकराव पर्वते, डॉ. एस. एन. पवार, ऍड. प्रकाश हिलगे, प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, डॉ. अनिल घस्ते आदी उपस्थित होते.