सातारा / प्रतिनिधी :
वाई येथील वन विभागाचे कार्यालय हे छोटेखानी जुन्या इमारतीत भरत होते. लगतच विराट झाडे होती. मात्र, त्याच इमारतीच्या जागेवर नव्याने बांधकाम सुरू असून, त्या इमारतीच्या जागेवरून वाई वनविभाग आणि वाई प्रांत कार्यालय यांच्यामध्ये वाद सुरू झाला आहे. वाई प्रांत कार्यालय म्हणते की, ती जागा आमच्या मालकीची आहे तर वाई वन विभाग म्हणतेय की प्रांत कार्यालयाच्या इमारतीचे काही पिलर आमच्या जागेत आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार मकरंद पाटील यांनी इमारतीची पाहणी करताना माहिती घेतली तेव्हापासून हा वाद उफाळून आला आहे.
वाई वनविभागाचे कार्यालय हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्याच कार्यालयाला लागून प्रांत, तहसील कार्यालयाची नवीन इमारत उभी राहिली आहे. बाजूने स्टँप व्हेडरचे शेड ही पाडण्यात आले आहे. तेथे ही काम सुरू आहे. वाई वन विभागाच्या कार्यालयाला आजपर्यंत नवीन इमारत व्हावी यासाठी कोणीच प्रयत्न केले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जुन्या ब्रिटिश कालीन इमारतीमध्ये कार्यालय भरत होते. ती इमारत जीर्ण झाली होती. कधीही पडून कर्मचारी व अधिकारी यांना धोका निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, कोरोनाच्या काळात वाई वनविभागाच्या नुतन इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. त्याकरिता टप्याटप्याने हे काम केले जात आहे. त्यात सुरुवातीला बाजूची झाडे तोडण्यात आली. त्यानंतर कार्यालय अन्य ठिकाणी हालवून जुनी इमारत उतरवून घेतली.आणि सध्या नविन इमारतीचे काम हाती घेण्यात आले आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी आमदार मकरंद पाटील यांनी प्रांत कार्यालयाच्या नुतन इमारतीच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी प्रांत संगीता राजपुरकर-चौगुले यांना आमदारांनी वनविभागाच्या कामाबाबत विचारणा केली असता ती जागा आपली आहे, आपण त्यांना भाड्याने दिली होती ,असे सांगताच आबा अवाक झाले. तर वाई वनविभागाचे महेश झांजुरणे म्हणाले की, ती जागा वनविभागाची आहे. उलट प्रांत कार्यालयाच्या इमारतीचे पिलर वन विभागाच्या जागेत आहेत. आम्ही नियमानुसार काम करतो आहे, असे सांगितले. तसेच ते म्हणाले की प्रांत कार्यालयाची इमारत जेव्हा बांधली तेव्हाच जर वनविभागाच्या कार्यालयाला समावेश करून घेतला असता तर अडचण निर्माण झाली नसती. आता मात्र इमारतीच्या जागेच्या वादावरून वाई वनविभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.