प्रतिनिधी /बेळगाव
सांबरा विमानतळापासून बेळगावला येण्यासाठी त्वरित रेलबसची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन सीटीझन्स कौन्सीलने बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांना मंगळवारी सायंकाळी दिले. या निवेदनाची प्रत केंदीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाध्ये यांना पाठवून देण्याची विनंती करण्यात आली. आपण या मागणीचा गांभिर्याने करून त्याची कार्यवाही होण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही राजेशकुमार मौर्य यांनी दिली. कौन्सीलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर व सदस्य अरुण कुलकर्णी यांनी विमानतळावर हे निवेदन सादर केले.
निवेदनात कौन्सीलने म्हटले आहे की, बेळगाव विमानतळ हे 1942 साली बांधलेले ब्रिटिशकालीन प्रशस्त विमानतळ आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडले गेले असून विमानतळावर वाढत्या प्रवासीसंख्येमुळे महत्त्व आले आहे. बहुसंख्य प्रवासी विमानाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत.
परंतु याच विमानतळावरून प्रवाशांना बेळगावला येण्यासाठी रेलबस किंवा अन्य कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी विमानतळ ते बेळगाव शहर दरम्यान रेलबस सुरू करावी.सांबरा विमानतळावरून दिल्ली, मुंबई, बेंगळूर, चेन्नई, हैदराबाद, पुणे येथे प्रवास करणाऱया नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बहुसंख्य प्रवासी विमानाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. विमानतळावर आलेल्या प्रवाशाला किंवा बेळगावहून विमानतळावर जाणाऱया प्रवाशाला रिक्षा किंवा टॅक्सीशिवाय कोणताही पर्याय नाही.
मात्र त्यांचे दर परवडणारे नाहीत. बेळगाव रेल्वे स्टेशन हे महत्त्वाचे स्टेशन असून, बेंगळूर आणि मुंबईला येथुन रेल्वे सुविधा आहेत. सांबऱयालासुद्धा रेल्वेस्टेशन असून ते बेळगाव विमानतळाला अतिशय जवळचे आहे. सर्व संरचना (इन्फ्रास्ट्रक्चर) उपलब्ध असून, त्याचा उपयोग विमान प्राधिकरणाने करून घ्यावा व त्वरित रेलबस किंवा रेल कार्डची सुविधा सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
भारतातील अन्य विमानतळांवर ही सुविधा उपलब्ध आहे. रेलबसच्या सुविधांमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. आणि प्रवास करणेही सुकर होणार आहे. अर्थातच त्याचा उद्योग व्यवसाय वाढीसाठीसुद्धा लाभ होणार आहे. रेलबस सुरू झाल्यास विमान प्रवास करणाऱयांची संख्याही वाढण्याची शक्मयता आहे. या सर्वांचा विचार करून विमान प्राधिकरणाने रेल्वे खात्याशी लवकरात लवकर चर्चा करून परस्पर समन्वयाने प्रवाशांच्या सोयीसाठी रेलबसची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशी मागणीही कौन्सिलने केली आहे.
कौन्सिलची ही मागणी अत्यंत स्वागतार्ह असून, आपण त्याबाबत विमान प्राधिकरणाचे अधिकारी व केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी चर्चा करू, अशी ग्वाही मौर्य यांनी दिली.