ऑनलाईन टीम / मुंबई :
येस बँकेतील हजारो कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असलेले डीएचएफएलचे प्रमोटर्स कपिल वाधवान आणि आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सचे धीरज वाधवान या दोन्ही बंधूंना 10 मे पर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वाधवान बंधूंना आज सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. या दोन्ही बंधूंची अधिक चौकशी होणे आवश्यक असल्याने सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना 10 मे पर्यंत कोठडी सुनावली.
येस बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांच्याविरोधात दाखल झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात वाधवान बंधूंवर आरोप आहेत. डीएचएफएलच्या अल्प मुदतीच्या डीबेंचरमध्ये येस बँकेने 3,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली तेव्हा एप्रिल ते जून 2018 दरम्यान हा घोटाळा झाला. त्या बदल्यात वाधवान बंधूनी
राणा कपूर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जाच्या नावाखाली 600 कोटी रुपयांची लाच दिली होती.
वाधवान बंधू जामीनावर बाहेर असताना त्यांनी लॉकडाऊन काळात 8 व 9 एप्रिलला कुटुंबातील 23 सदस्यांसह मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. त्यानंतर त्यांना कुटुंबासह क्वारंटाईन करण्यात आले होते. वाधवान कुटुंबाचा क्वारंटाईन काळ संपल्यानंतर सीबीआयने धीरज आणि कपिल वाधवान या दोन बंधूंना 26 एप्रिल रोजी सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतले होते.