100 कोटी अनुदानातून शहर-उपनगरांत 17 हून अधिक ग्लासहाऊसची उभारणी : काही ठिकाणी दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारी

प्रतिनिधी बेळगाव
महापालिकेच्यावतीने शहरातील विविध उद्यानात आणि खुल्या जागांवर ग्लासहाऊसची उभारणी केली आहे. शहर आणि उपनगरांत 17 हून अधिक ग्लासहाऊस उभारण्यात आली आहेत. मात्र, या ग्लासहाऊसचा उपयोग होत नसल्याने महांतेशनगरसह शहरातील ग्लासहाऊस धूळ खात पडली आहेत. सदर ग्लासहाऊस नागरिकांच्या सेवेसाठी कधी उपलब्ध होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री शहर विकास अनुदानातून राज्य शासनाकडून 400 कोटी रुपये देण्यात आले. या अंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात आली आहेत. त्याचबरोबर चौथ्या टप्प्यातील 100 कोटी अनुदानातून उद्यानांच्या विकासाबरोबर विविध उद्यानात आणि खुल्या जागांवर ग्लासहाऊसची उभारणी करण्यात आली आहे. विशेषतः उत्तर विभागातील उद्यानांमध्ये ग्लासहाऊसची उभारणी करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. सध्या शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे. कुटुंबातील सदस्यसंख्या वाढल्याने राहते घर अपुरे पडत आहे. त्यामुळे लहान-मोठे कार्यक्रम करण्यासाठी मंगल कार्यालयाकरिता पैसे मोजावे लागत आहेत. विशेषतः गरजू आणि गरिबांना याचा अधिक भुर्दंड बसत आहे. अशा गरजू आणि गरीब नागरिकांना कौटुंबिक कार्यक्रम करण्यासाठी शहरातील विविध उद्यानात व खुल्या जागांवर ग्लास हाऊसची उभारणी करण्यात आली आहे. पण सदर ग्लासहाऊसचा उपयोग म्हणावा तसा होत नाही.
ग्लासहाऊसचा विनियोग शून्य
ग्लासहाऊस भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिकेने भाडय़ाच्या रकमेचा दरही निश्चित केला आहे. पण सदर ग्लासहाऊस अद्यापही नागरिकांसाठी उपलब्ध नाही. काही ग्लासहाऊसमध्ये आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी गळती लागली आहे. शहरात 17 हून अधिक ग्लासहाऊस उभारण्यात आली आहेत. पण यापैकी कोणत्याच ग्लासहाऊसचा उपयोग कार्यक्रमाकरिता होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
ग्लास हाऊसकरिता कोटीचा निधी वापरण्यात आला आहे. पण ग्लासहाऊसचा विनियोग पाहता शून्य आहे. वास्तविक पाहता नागरिकांना अल्प दरात ग्लासहाऊस उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मात्र महापालिकेकडून याबाबत कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे उद्यानात उभारण्यात आलेले ग्लासहाऊस केवळ शोभेचे बनले आहेत.
ग्लासहाऊसचा वापर केला जात नसल्याने धूळ साचली असून, काही ठिकाणी दुरुपयोग केला जात आहे. ग्लास हाऊससमोर असलेल्या दिव्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्लासहाऊसच्या देखभालीसह गरजूंना ग्लासहाऊस उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
स्वच्छता राखण्याकडे कर्मचाऱयांचे दुर्लक्ष
महापालिकेने विविध खुल्या जागांमध्ये उद्याने निर्माण केली आहेत. दक्षिण आणि उत्तर भागात अनेक उद्याने आहेत. यामधील मोठय़ा आणि महत्त्वाच्या उद्यानांची देखभाल व्यवस्थित केली जाते. मात्र, अन्य उद्यानांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पण उद्यानांच्या देखभालीकरिता महापालिकेने माळी कामगार व वॉचमनची नियुक्ती केली आहे. काही ठिकाणी उद्यानातील काही ठरावीक भागातील स्वच्छता राखली जाते. उद्यानात खेळाचे साहित्य व इतर क्रीडा उपक्रम राबविण्यात आले आहेत. दुसरीकडील उद्यानातही विविध साहित्य, बसण्यासाठी आसन व्यवस्था, वॉकिंग पाथ निर्माण करण्यात आले आहेत. तसेच विविध प्रकारची शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे येथील कर्मचारी केवळ शोभेच्या झाडांची देखभाल करून दिवसभर आराम करतात. पण उद्यानांच्या सभोवती असलेली झाडेझुडुपे हटवून स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
महांतेशनगर येथील उद्यानाच्या दर्शनी भागातील स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. पण मागील बाजूस असलेल्या भागात स्वच्छता राखण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथील उद्यानात खेळाचे साहित्य बसविण्यात आले आहे. मात्र, खेळाच्या साहित्याभोवती वाढलेले गवत व झाडेझुडपे हटविण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सुटीच्या दिवशी व सायंकाळच्या वेळी मुले खेळण्यासाठी उद्यानात येत असतात. पण येथील खेळाचे साहित्य गवत व झुडपांमध्ये हरवले आहे. उद्यानात गवत व झुडपे वाढल्याने सापा-किडय़ांचे वास्तव्य असते. त्यामुळे लहान मुलांना धोकादायक बनले आहे.