प्रतिनिधी/वारणानगर
येथील श्री. वारणा महिला उद्योग समूह, वारणा बझार व श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सह साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई विलासराव कोरे वय ७७ यांचे आज, सोमवारी (दि.12) पहाटेच्या सुमारास सोलापूर येथे निधन झाले. शोभाताई कोरे या गेली काही दिवस आजारी होत्या. सोलापूर येथे असणाऱ्या कन्या व जावई यांच्या हॉस्पीटलमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू होते.
वारणा बॅकेचे चेअरमन निपून कोरे, आमदार विनय कोरे यांच्या त्या मातोश्री होत. श्रीमती शोभाताई कोरे यांच्या निधनाने वारणा समूहासह परिसरावर शोककळा पसरली आहे.
वारणा समूहाचे संस्थापक वारणा खो-याचे भाग्यविधाते सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे, वारणा साखर कारखान्याच्या अध्यक्षा स्व. श्रीमती सावित्रीआक्का विश्वनाथ तथा तात्यासाहेब कोरे यांच्या कार्याचा, संस्कारांचा वसा व वारसा समर्थपणे चालवत त्यांनी सहकार, शिक्षण, महिला सबलीकरण या क्षेत्रात आदर्श कार्य केले. महीला उद्योग व शिक्षण क्षेत्रात सर्वाना मार्गदर्शक ठरलेल्या शोभाताई कोरे या वारणा समूहात आईसाहेब या नावाने सर्वत्र परिचीत होत्या.