चिपळूण : वाशिष्ठी नदीवरील याच पुलाचे काम दिवस-रात्र सुरू आहे
प्रतिनिधी / चिपळूण
मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतलेला असतानाच आता पुलांची रखडलेली कामेही हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये डिसेंबरपर्यंत एकेरी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने वाशिष्ठी नदीवरील पुलाचे काम दिवस – रात्र सुरू आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम होण्यापूर्वीच पुलांची कामे प्रथम हाती घेण्यात आली. त्यामध्ये वाशिष्ठी पुलाचा समावेश आहे. कशेडी ते झाराप या तिसऱया टप्प्यातील 289 कि.मी.च्या चौपदरीकरणात असलेल्या 14 मोठ्या पुलांमध्ये वाशिष्ठी नदीवर उभारण्यात येत असलेले 2 पूल 30 मीटर उंचीचे आणि 248 मीटर लांबीचे असून कोकणातील चौपदरीकरणातील पुलांमध्ये ते सर्वाधिक मोठे व उंच ठरणार आहेत. मात्र पुलाचे काम सुरू झाल्यानंतर ते गेल्या 2 वर्षापासून रखडले होते. पुलाचे बांधकाम करणाऱया ठेकेदार कंपनीनेही काम अर्धवट सोडल्याने पुलाचे काम वर्षभर ठप्प होते.
दरम्यान, परशुराम ते खेरशेत दरम्यानच्या टप्प्याचे काम करणाऱया चेतक कंपनीनेही काम सोडल्यानंतर आता त्याचीच भागीदार असलेली इगल इन्फा कंपनी राहिलेले काम पूर्ण करत असून आता पुलाचे कामही ही कंपनी करत आहे. गेल्या 15 दिवसांपासून 50 कामगार दिवस-रात्र वाशिष्ठी पुलाचे काम करीत आहेत. डिसेंबरअखेरपर्यत या नव्या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याची मुदत देण्यात आल्याने त्या दृष्टीने नियोजन करून काम सुरू आहे.
Related Posts
Add A Comment