क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील वास्को स्पोर्ट्स क्लब व पणजी फुटबॉलर्स यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत संपली. काल हा सामना जीएफएच्या धुळेर मैदानावर खेळविण्यात आला.
या निकालाने उभय संघांना समान एक गुण प्राप्त झाला. वास्को स्पोर्ट्स क्लबचे आता 7 सामन्यांतून 13 गुण झाले आहेत. पणजी फुटबॉलर्सचा हा स्पर्धेतील दुसरा बरोबरीत राहिलेला सामना आहे.
दरम्यान, गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेली 20 वर्षांखालील तासा गोवा फुटबॉल स्पर्धेतील कळंगूट असोसिएशन आणि यूथ क्लब मानोरा यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत संपली. मध्यंतराला निकोलस नोरोन्हाने सहाव्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलने कळंगूट असोसिएशनचा संघ आघाडीवर होता. यूथ क्लब मानोराच्या आकाशने इंज्यूरी वेळेत बरोबरीचा गोल केला.