आरटीओ ऑनलाईन व्यवहार 88.43 टक्के सुलभता आणण्यासाठी प्रयत्न, ‘वाहन’ ऍपमधून 88.49 तर ‘सारथी’मधून 86.28 टक्के करभरणा
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या ऑनलाईनचाच जमाना आहे. ऑनलाईनवरूनच वीज बिल भरणा, इतर व्यवहार होताना दिसत आहेत. सरकारनेही काही कार्यालयाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच आकारण्यास सुरुवात केली. उपनोंदणी कार्यालयानंतर सर्वाधिक महसूल देणारे कार्यालय म्हणून आरटीओकडे पाहिले जाते. या आरटीओचा कारभारही आता ऑनलाईन सुरू असून 88.43 टक्के व्यवहार ऑनलाईन होत आहेत. आता कर भरणारे, परवाना काढणारे वाहनचालक ऑनलाईनच्या माध्यमातूनच सर्व व्यवहार करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयात पेपरलेसवर्क झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहन आणि सारथी ऍपमधून आतापर्यंत 107 कोटी, 45 लाख, 88 हजार 867 रुपयांचा कर मिळाला आहे.
केंद्र सरकारने ऑनलाईनच्या माध्यमातूनच सर्व व्यवहार होण्यावर भर दिला आहे. आता रोख रक्कम किंवा बँकेमध्ये जाऊन डीडी काढण्याऐवजी ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही संबंधित विभागाच्या वेबसाईटवर अथवा ऍपवर रक्कम जमा करू शकतो. जमा केल्यानंतर काही वेळातच रक्कम जमा झाल्याचा एसएमएस येतो. त्यामुळे व्यवहारामध्ये पारदर्शकता तर येतेच, मात्र यामुळे वेळ व हेलपाटा वाचतो. आरटीओ कार्यालयामध्ये यापूर्वी प्रत्येक व्यवहार कागदोपत्री नोंद करून होत होता. त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. मात्र आता ऑनलाईनवर केवळ एका क्लीकमध्ये सर्व माहिती उपलब्ध होते. त्यामुळे अधिकाधिक व्यवहार ऑनलाईनच होत आहेत.
आरटीओ कार्यालयात रोख रक्कमेऐवजी ऑनलाईनद्वारे थेट सरकारच्या तिजोरीत रक्कम जमा होताना दिसत आहे. आरटीओ कार्यालयाचा इतिहास हा ब्रिटिश काळापासूनच आहे. ब्रिटिश कारभाऱयांनी वाहतुकीचे नियम लावण्यासाठी आणि कर गोळा करण्यासाठी या कार्यालयाची स्थापना केली होती. बेळगाव येथील आरटीओ कार्यालयाचीही स्थापना सुमारे 1940 च्या दशकात झाली. तेंव्हापासून सर्व कारभार रोख आणि कागदोपत्री चालायचा. आता हे कार्यालय हळूहळू कात टाकत असून आधुनिकतेकडे वळले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सर्वच व्यवहार ऑनलाईन होत आहेत. यामुळे कामासाठी तासन्तास ताटकळत थांबणाऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जुनी कागदपत्रे तसेच इतर काही व्यवहार कागदपत्रांवर चालत असला तरी इतर सर्व कारभार किंवा पैशांचे व्यवहार हे ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे एजंटगिरीला काही प्रमाणात चाप बसला आहे. वाहने जप्त किंवा दंड आकारणी हे सर्व व्यवहार ऑनलाईन करण्यात येत आहेत.
शुल्क किंवा महसूल हे ऑनलाईनद्वारे होत असल्याने व्यवहार पारदर्शक होत आहे. वाहन परवान्यासाठी सरकारने ‘वाहन’ आणि ‘सारथी’ ऍप सुरू केले असून बेळगाव आरटीओ कार्यालयात या ऍपद्वारे सर्व व्यवहार ऑनलाईन सुरू आहेत.
सर्व व्यवहार ऑनलाईन करण्याचे प्रयत्न – आरटीओ शिवानंद मगदूम

सध्या येथील कारभाराला आधुनिकतेची जोड मिळत आहे. महसूल किंवा शुल्क हे ऑनलाईनद्वारेच भरले जात आहेत. आता या कामाला चालना देऊन येथील सर्व कारभार ऑनलाईन कसा होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाहन आणि सारथी ऍपमुळे अधिकाधिक नागरिकांनी ऑनलाईनवरच भर दिला असून यापुढे कार्यालयातील गर्दी कमी होणार आहे.