दुपारपर्यंत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू : सकाळी काही प्रमाणात भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरात सलग दुसऱया दिवशीही विकेंड लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यात आले. दुपारी दोन वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने काही प्रमाणात नागरिकांची ये-जा होती. परंतु दुपारनंतर मात्र बाजारपेठेत नीरव शांतता पसरल्याचे चित्र दिसून आले.
जिल्हय़ात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने लॉकडाऊनचे नियम शिथिल केले जात आहेत. विकेंड लॉकडाऊन करत असतानाही जीवनावश्यक वस्तू व सेवा यांना मुभा देण्यात आली. दुपारी 2 वाजेपर्यंत दूध, भाजीपाला, फळे, अन्न पदार्थ, किराणा दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने सकाळी काही प्रमाणात भाजी खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. नोकरदार भाजी व इतर साहित्य खरेदीसाठी बाहेर पडल्याने बाजारपेठ परिसरात काही प्रमाणात वर्दळ होती.
मटण, चिकन व मासळीवर ताव
मागील विकेंड लॉकडाऊनवेळी सर्वच व्यवहार बंद होते. परंतु या आठवडय़ात चिकन, मटण, मासे यांची दुपारपर्यंत विक्री सुरू होती. साप्ताहिक सुटीमुळे अनेक नागरिकांनी मांसाहारी पदार्थांवर ताव मारला. यामुळे चिकन, मटण दुकानांसमोर खवय्यांची गर्दी दिसून आली.