बेळगाव : गडहिंग्लज येथे जीसीपीसी चषक 14 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत विजया अकादमी बेळगाव संघाने यजमान जीसीपीसी ब संघाचा 140 धावाने पराभव करून विजयी सलामी दिली. शतक झळकावणाऱया नवीन बेकवाडकर याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
विजया अकादमीने 25 षटकात 4 बाद 261 धावा केल्या. नवीन बेकवाडकरने 15 चौकारासह स्पर्धेतील पहिले शतक झळकाविले त्याला आशुतोष हिरेमठने 3 षटकार व 10 चौकारासह 72 धावा करून अर्धशतक झळकविले. स्वाती भाटेने 30 तर साईराज साळुंकेने 28 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना जीसीपीसी संघाचा डाव 20 षटकात सर्वबाद 120 धावात आटोपला. त्यात शुभमने 21 तर फरान पीने 18 धावा केल्या. विजयातर्फे श्रेयस बिर्जेने 3 तर स्वरूप साळुंके व गौरव पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.